इंडियास्किल्स स्पर्धा २०२६-२७ साठी ऑनलाइन नोंदणी सुरू; जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

इंडियास्किल्स स्पर्धा २०२६-२७ साठी ऑनलाइन नोंदणी सुरू; जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
जळगाव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित इंडियास्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७ या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.
इंडियास्किल्स स्पर्धा ही देशातील विविध कौशल्य क्षेत्रांतील उत्कृष्ट स्पर्धकांचा शोध घेऊन त्यांना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्ल्डस्किल्स कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणारी प्रतिष्ठित स्पर्धा आहे. या स्पर्धेत इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डिंग, वेब टेक्नॉलॉजी, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, क्लाऊड कॉम्प्युटिंग, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, कारपेंट्री, ग्राफिक डिझाईन, फॅशन टेक्नॉलॉजी, रिन्यूएबल एनर्जी, प्लंबिंग, इंडस्ट्रियल मेकॅनिक्स आदींसह एकूण ६३ कौशल्य क्षेत्रांमध्ये सहभागाची संधी उपलब्ध आहे.
स्पर्धेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम स्किल इंडिया डिजिटल हब (एसआयडीएच) पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करून आधार आधारित ई-केवायसी पूर्ण करावी व इंडियास्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७ या पर्यायातून ऑनलाइन अर्ज सादर करावा.
या स्पर्धेसाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही. क्लाऊड कॉम्प्युटिंग, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, वॉटर टेक्नॉलॉजी या कौशल्य क्षेत्रांसाठी स्पर्धकांचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तर उर्वरित सर्व कौशल्य क्षेत्रांसाठी स्पर्धकांचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचा असावा.
स्पर्धेचे आयोजन प्रथम जिल्हास्तरावर, त्यानंतर विभागस्तर व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावर, तर राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी स्पर्धकांना जागतिक स्पर्धेसाठी नामांकनाची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), अभियांत्रिकी महाविद्यालये, पॉलिटेक्निक महाविद्यालये, कौशल्य प्रशिक्षण संस्था तसेच पात्र युवक-युवतींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन जिल्ह्याचे राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावरही माहिती उपलब्ध होईल.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड जळगाव यांनी केले आहे.






