दिवाळीच्या सणातही पाण्यासाठी अमळनेरकरांची वणवण!

दिवाळीच्या सणातही पाण्यासाठी अमळनेरकरांची वणवण!
नागरिक त्रस्त, नगरपालिकेच्या कारभारावर संताप
अमळनेर (प्रतिनिधी) – दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात अमळनेर शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून, नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नव्या ठेकेदार पर्वात नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु सत्ता बदलून अवघे सहा महिने उलटताच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नळाला पाण्याचा थेंबही येत नाही. महिलांना पाण्यासाठी लांबवर जावे लागत आहे, तर काही नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
घरांची साफसफाई, फराळाची तयारी आणि पाहुण्यांची ये-जा अशा सणासुदीच्या काळात पाण्याची टंचाई नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी मोठा निधी मंजूर असतानाही शहरात पाण्याची ही बिकट अवस्था का निर्माण झाली, याबाबत प्रशासन मौन बाळगत आहे.
“नवीन प्रशासनाने पाणीटंचाईचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती, पण परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दिवाळीचा सण साजरा करायचा की पाण्यासाठी धावपळ करायची, हेच समजत नाही,” असे नागरिक संतापाने सांगत आहेत.
दरम्यान, पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास नागरिकांकडून नगरपालिकेविरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






