Crime

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

१५ संघांतील ६८५ महिला गोविंदांचा सहभाग; प्रत्येक गोविंदाला १० लाखांचा अपघाती विमा

ढोलपथक, मर्दानी खेळ, लेझर शो, फटाक्यांची आतषबाजी अन् रिल्स स्टार युवतींची धमाल

जळगाव, दि. २९ (प्रतिनिधी) : नारीशक्तीचा जागर, साहसाचा थरार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष असा अनोखा संगम ‘युवतींची दहीहंडी २०२६’मध्ये अनुभवता येणार आहे. येत्या शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत शिवतीर्थ मैदान (जी.एस. ग्राउंड), जळगाव येथे या भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या उपक्रमात शाळा-महाविद्यालयांच्या १५ संघांमधून तब्बल ६८५ महिला गोविंदा सहभागी होणार आहेत.

‘नारीशक्तीचा गजर, दहीहंडीचा थरार’ या संकल्पनेवर आधारित या सोहळ्यात युवतींच्या धाडसी मानवी मनोऱ्यांचा थरार जळगावकरांना अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे सहभागी प्रत्येक महिला गोविंदाचा आयोजकांकडून १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आला आहे. युवतींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संपूर्ण आयोजनाचे नियोजन करण्यात आले आहे.

२१३ ढोलवादकांचा दणदणाट

दहीहंडीच्या थरारासोबतच कार्यक्रमात विविध आकर्षणांची रेलचेल असणार आहे. ‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांतील तब्बल २१३ ढोलवादकांच्या दमदार वादनाने वातावरणात उत्साह निर्माण होणार आहे. यासोबतच मर्दानी खेळ, सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

शहरातील १५ रिल्स स्टार युवतीही या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार असून, त्यांच्या सहभागामुळे तरुणाईमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. पारंपरिक दहीहंडीला आधुनिक मनोरंजनाची जोड देत हा सोहळा जळगावकरांसाठी अविस्मरणीय करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

युवतींच्या सामर्थ्याला मिळणार व्यासपीठ

‘महाराष्ट्रातील एकमेव युवतींची दहीहंडी’ अशी ओळख निर्माण केलेल्या या उपक्रमाचा उद्देश युवतींच्या सामर्थ्याला आणि कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. पारंपरिक सण-उत्सवांमध्ये युवतींचा सक्रिय सहभाग वाढविण्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण, साहस आणि निर्णयक्षमता यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

‘संस्कृतीची जाण, उत्सवाची शान’ हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात जळगावकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रवेश विनामूल्य

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला, आत्मविश्वासाला आणि उत्साहाला दाद द्यावी, असे आवाहन भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button