कवठळ येथे युवकांचा स्वच्छता उपक्रम; गटार साफ करून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश
"एक दिवस स्वच्छतेचा दिवस" उपक्रमातून गाव स्वच्छतेची जनजागृती

कवठळ येथे युवकांचा स्वच्छता उपक्रम; गटार साफ करून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश
“एक दिवस स्वच्छतेचा दिवस” उपक्रमातून गाव स्वच्छतेची जनजागृती
कवठळ, ता. धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कवठळ गावातील युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. गावातील हनुमान मंदिर ते दूध डेअरीपर्यंतच्या गटारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. गटारांमध्ये साचलेली घाण, प्लास्टिक कचरा आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता.
या समस्येची दखल घेत गावातील युवक विशाल पाटील व बबलू पवार यांच्या नेतृत्वाखाली “एक दिवस स्वच्छतेचा दिवस” हा उपक्रम राबविण्यात आला. युवकांनी श्रमदान करत संपूर्ण गटारातील घाण, प्लास्टिक व कचरा काढून परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमामुळे परिसरातील दुर्गंधी व अस्वच्छतेची समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली.
यावेळी युवकांनी स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा संदेश दिला. तसेच आजूबाजूच्या गावांतील युवकांनीही अशा प्रकारचे उपक्रम राबवून गाव स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा आणि “एक दिवस स्वच्छतेचा दिवस” म्हणून पाळावा, असे आवाहन करण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेत तुषार, ज्ञानेश्वर, यश, वैभव, सचिन सूर्यवंशी, विलास सोनवणे यांच्यासह अनेक युवकांनी सक्रिय सहभाग घेतला. युवकांच्या या सामाजिक उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.






