Social

कानातून पाणी, डोकेदुखीने आणली शस्त्रक्रियेची वेळ

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार

कानातून पाणी, डोकेदुखीने आणली शस्त्रक्रियेची वेळ

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार

जळगाव – कानातून सतत पाणी येणे आणि तीव्र डोकेदुखी या त्रासामुळे त्रस्त झालेल्या ७० वर्षीय रूग्णावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालय येथे कान-नाक-घसा (एछढ) तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या आजारावर वेळेवर निदान आणि योग्य उपचारामुळे रूग्ण केवळ तीन महिन्यांत पूर्णपणे बरा झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, देवीदास तायडे (वय ७० रा. अमोदा) रूग्णाला गेल्या काही महिन्यांपासून कानातून सतत पाणी येत होते. त्याचबरोबर कानाच्या वरच्या भागात तीव्र वेदना आणि डोकेदुखीचा त्रास वाढत चालला होता. या त्रासामुळे रूग्णाने विविध ठिकाणी उपचार घेतले. कान आणि नाकाच्या भागाची तीन वेळा बायोप्सी देखील करण्यात आली.

काही ठिकाणी त्याला कॅन्सर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, त्यामुळे रूग्ण आणि कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.शेवटी रूग्णाने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. येथे कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ.अनुश्री अग्रवाल यांनी सखोल तपासणी करत सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचण्या केल्या. या तपासणीतून रूग्णाला स्कल बेस ऑस्टिओमायलायटिस हा दुर्मिळ पण गंभीर संसर्गजन्य आजार असल्याचे स्पष्ट झाले. हा आजार वेळेवर उपचार न केल्यास मेंदूपर्यंत पसरू शकतो, त्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते. निदान झाल्यानंतर कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या टीमने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाक आणि कान या दोन्ही मार्गांद्वारे एकाच वेळी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून सुमारे सहा ते आठ तास चालली. शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गग्रस्त भाग काळजीपूर्वक काढून टाकण्यात आला आणि आवश्यक ती स्वच्छता करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अनुश्री अग्रवाल यांना डॉ. सायकत बासू, भूलशास्त्र तज्ज्ञांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर दुसर्‍याच दिवशी रूग्णाच्या डोकेदुखीत मोठी घट झाली आणि कानातून पाणी येणे थांबले. पुढील काही आठवड्यांत औषधोपचार आणि नियमित फॉलोअपमुळे रूग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली. अवघ्या तीन महिन्यांत रूग्ण पूर्णपणे बरा झाला असून सध्या तो सामान्य जीवन जगत आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली.

स्कल बेस ऑस्टिओमायलायटिस हा आजार दुर्मिळ असला तरी अत्यंत गंभीर आहे. अनेक वेळा त्याची लक्षणे साध्या कानाच्या संसर्गासारखी वाटतात, त्यामुळे निदान उशिरा होते. योग्य वेळी सीटी स्कॅन आणि एमआरआयसारख्या तपासण्या केल्यास अचूक निदान करता येते. या प्रकरणात वेळेवर निदान आणि संयुक्त शस्त्रक्रिया केल्यामुळे रूग्णाला पूर्णपणे बरे करता आले.
– डॉ. अनुश्री अग्रवाल, ईएनटी विभागप्रमुख, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button