CrimeOther

वरणगावजवळ मृत्यूचा थरार : लस्सी पिण्यासाठी निघाले, पण काळाने घातला घाला, महिलेसह तिघे ठार

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वरणगावजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या नातेवाईकांनी न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील रहिवासी असलेले फासे पारधी समाजातील काही कुटुंबीय वरणगाव परिसरातील कपीलनगर येथे पत्र्याच्या घरात वास्तव्यास होते. ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत होते.

शुक्रवारी दुपारी जय शंकर काळे (वय-१९) हा मामी ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय-३०) आणि दोन मुले विघ्नेश शंकर चव्हाण (वय-१४) व मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय-१) हे चौघे दुचाकीवरून वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात होते. दरम्यान, वरणगावच्या पुढे एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चौघांनाही गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी दुचाकी ओळखून संबंधितांच्या गावात माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती चौघांनाही मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. कुटुंबातील चार सदस्यांचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button