Crime

ब्रेकिंग : जळगाव मनपाची ४३ कोटींची फसवणूक? ‘अटलांटा’विरोधात गुन्हा दाखल

९ वर्षांच्या कालावधीत करारभंग, निधी गैरवापराचा आरोप; EOW कडे तपास वर्ग

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईस्थित मे. अटलांटा कंस्ट्रक्शन कं. (इंडीया) लि. आणि त्यांच्या संचालकांसह संबंधितांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल ४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे CCTNS क्र. १२७/२०२६ नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड विधानातील कलम ४०६, ४०९ व ४२० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दिनांक १ मे रोजी रात्री ९.१० वाजता दाखल करण्यात आला. याप्रकरणी फिर्याद जळगाव महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता योगेश प्रकाश बोरोले (वय ४६) यांनी दिली आहे.

या गुन्ह्यात मे. अटलांटा कंस्ट्रक्शन कं. (इंडीया) लि.मुंबई, संचालक राझू अंबालाल वावरोट (रा. अंधेरी, मुंबई)तसेच कंपनीचे इतर संचालक व संबंधित व्यक्ती यांना आरोपी करण्यात आले आहे. जळगाव शहर मनपाचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी याबाबत पाठपुरावा करत गुन्हा दाखल करण्याची मागणी घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील यासंदर्भात भेट घेण्यात आली होती.

नेमका प्रकार काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० मार्च १९९७ ते १ एप्रिल २००६ या कालावधीत तत्कालीन जळगाव नगरपरिषदेकडून रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी निविदा घेण्यात आली होती. संबंधित कंपनीने पेव्हर मशीनच्या सहाय्याने काम करण्याचे मान्य केले होते. मात्र, करारानुसार मुदतीत काम पूर्ण केले नाही. नगरपरिषदेचा विश्वास संपादन करून संगनमताने फसवणूक केली. Mobilisation Fund (मुळ रक्कम), त्यावरील व्याज, दंड आणि पालिकेचा अतिरिक्त खर्च या सर्वांचा समावेश करून ४२.६० कोटींचा आर्थिक तोटा केल्याचा आरोप आहे.

तपास EOW कडे वर्ग
या गंभीर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास Economic Offences Wing (EOW), जळगावकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. हे प्रकरण केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरते मर्यादित नसून, सार्वजनिक निधीच्या वापराबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. दीर्घ कालावधीनंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे प्रशासन आणि ठेकेदारी व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button