

ईको सायलेंसर चोरीच्या तयारीत दोघे अटकेत
६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; मौल्यवान धातूंसह कार व चोरीचे साहित्य ताब्यात
पारोळा, प्रतिनिधी : ईको वाहनांच्या सायलेंसरमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडियम हे मौल्यवान धातू चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन इसमांना पारोळा पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
५ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथकाने कारवाई केली. म्हसवे गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नाकाबंदी सुरू असताना सायंकाळी सुमारे ५ वाजता निळ्या रंगाची मारुती वॅगनार (क्र. DL-3-CBU-3358) संशयास्पदरीत्या आढळून आली.
सायलेंसर काढण्याचे साहित्य सापडले
वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये ईको वाहनांचे सायलेंसर काढण्यासाठी वापरले जाणारे टॉमी, हातोडा, रिंच तसेच ईको वाहनांचे तीन सायलेंसर आढळले. एका मोठ्या थैलीमध्ये १० पांढऱ्या कॅरीबॅग आढळून आल्या. त्यामध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडियम हे मौल्यवान धातू असल्याचे आढळले.
पोलिसांनी वाहनातील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे यासिफ यामीन चौधरी (२२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आरीफ सलीम (२३, रा. अलीगढ, उत्तर प्रदेश) अशी असल्याचे समोर आले.
रात्री ईको वाहनांचे सायलेंसर चोरण्याचे नियोजन
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी पारोळा तालुक्यातील रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी रात्री उभ्या असलेल्या ईको वाहनांचे सायलेंसर काढून त्यातील मौल्यवान धातू चोरी करण्याचे नियोजन केले होते.
६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
कारवाईत ४ लाख रुपये किमतीची मारुती वॅगनार, १.५० लाख रुपये किमतीच्या मौल्यवान धातू असलेल्या १० कॅरीबॅग, ७५ हजार रुपये किमतीचे तीन ईको सायलेंसर आणि १० हजार रुपये किमतीचा इनफिनिक्स मोबाईल, तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी टॉमी, हातोडा व रिंच सेट असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी आकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.







