Crime

नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अँक्शन मोडमध्ये : वाळूमाफियांना दणका पण मातब्बर सुसाट!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने मोठी आणि नियोजित कारवाई करत कडक संदेश दिला आहे. विशेष म्हणजे, नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली असून त्यांच्या कार्यशैलीची जिल्ह्यात प्रभावी सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, काही पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक्षकांच्या सूचनेला हलक्यात घेतल्याचे दिसून येते.

दिनांक २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजेपासून ते २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारी एकूण ४ वाहने ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्यावर बी.एन.एस. २०२३ चे कलम ३०३(२) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १३०(१), १७७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस स्टेशननिहाय जप्त वाहनांचा तपशील
भडगाव पो.स्टे. – ट्रॅक्टर (किंमत ₹४,५०,०००) – अवैध वाळू ₹४,०००
चोपडा ग्रामीण पो.स्टे. – ट्रॅक्टर (किंमत ₹४,००,०००) – अवैध वाळू ₹४,०००
चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. – डंपर (किंमत ₹१०,००,०००) – अवैध वाळू ₹२०,०००
यावल पो.स्टे. – डंपर (किंमत ₹७,००,०००) – अवैध वाळू ₹१५,०००
एकूण : वाहनांची किंमत २५ लाख ५० हजार

नवीन एसपींचा ठसा उमटला
नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अल्पावधीतच जिल्ह्यात शिस्त, तत्परता आणि परिणामकारक कारवाईची नवी दिशा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल अधिक सक्रिय झाल्याचे या कारवाईतून दिसून येते. अवैध धंद्यांवर आळा घालण्याची त्यांची ठाम भूमिका नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.

पुढील कारवाईचा इशारा
जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहतील. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कुठलीही सूट दिली जाणार नाही, असा कडक इशाराही देण्यात आला आहे. संपूर्ण कारवाई ही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव विभाग) आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत (जळगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तालुका, नशिराबाद, अमळनेर, जामनेर पोलिसांना वाहन गवसेना
जिल्ह्यात ४ ठिकाणी पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला. दरम्यान सध्या जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतून थेट नशिराबादमार्गे बायपासने सुसाट वाळू वाहतूक सुरू आहे. मोहाडी-धानोरा, शिरसोली परिसरातून वाळूची वाहने सुसाट वेगाने जामनेरकडे धावत आहेत. अमळनेर हद्दीत बोरी आणि तापी नदी पात्र ओरबाडले जात आहे. असे असताना देखील या चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही कारवाई नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button