Social

राखीचा धागा जुळला माणुसकीशी; ‘विशेष’ भगिनींसोबत GPS परिवाराचे अनोखे रक्षाबंधन

राखीचा धागा जुळला माणुसकीशी; ‘विशेष’ भगिनींसोबत GPS परिवाराचे अनोखे रक्षाबंधन

अंध, दिव्यांग व अनाथ भगिनींच्या मनगटावर राखी; ‘अतूट धागा मायेचा’ उपक्रमातून जपले रक्ताच्या नात्यापलीकडचे बंध

पाळधी/जळगाव, (प्रतिनिधी) : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर प्रेम, आपुलकी, विश्वास आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत राहण्याची भावना जपणारा दिवस. याच भावनेला सामाजिक बांधिलकीची जोड देत पाळधी येथे GPS मित्र परिवाराने अंध, दिव्यांग व अनाथ भगिनींसोबत ‘अतूट धागा मायेचा’ हा अनोखा रक्षाबंधन सोहळा साजरा केला.
मायेच्या नात्यापासून कोणतीही भगिनी वंचित राहू नये, या संवेदनशील भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने रक्षाबंधनाच्या सणाला माणुसकीचा नवा अर्थ दिला.

राखी बांधताना जुळले मायेचे बंध
या सोहळ्यात अंध, दिव्यांग आणि अनाथ भगिनींना सन्मानाने सहभागी करून घेण्यात आले. भगिनींनी GPS परिवारातील भावांच्या मनगटावर राखी बांधली आणि औक्षण केले. काही क्षणांतच रक्ताच्या नात्यापलीकडे माया, स्नेह आणि आपुलकीचे नवे नाते निर्माण झाले.

भगिनींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उपस्थितांच्या डोळ्यांत दाटलेले भाव या सोहळ्याला विशेष हृदयस्पर्शी बनवून गेले. त्यांच्या सुख-दुःखात तसेच गरजेच्या प्रत्येक प्रसंगी GPS परिवार त्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
सामाजिक बांधिलकीची परंपरा पुढे
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतापराव पाटील यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली GPS मित्र परिवाराच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
गरजू आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या याच सेवाभावी परंपरेतून या विशेष रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

आरोग्यापासून रोजगारापर्यंत मदतीचा हात
GPS मित्र परिवाराच्या माध्यमातून आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी मदत, रक्तदान शिबिरे, गरजू कुटुंबांना सहाय्य, युवकांसाठी रोजगारविषयक उपक्रम तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
या सामाजिक कार्याला रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची जोड देत ‘अतूट धागा मायेचा’ हा उपक्रम राबविण्यात आला.

राखी मनगटावरची नव्हे, माणुसकीच्या नात्याची…’
‘राखी केवळ मनगटावर बांधली जात नाही; ती माणसाला माणसाशी जोडते,’ याची अनुभूती या सोहळ्यात आली. समाजातील विशेष गरजा असलेल्या भगिनींसोबत सणाचा आनंद वाटून घेत GPS मित्र व मैत्रीण परिवाराने माया, स्नेह, विश्वास आणि आधाराचे बंध अधिक घट्ट केले.
‘आपला आनंद इतरांसोबत वाटण्यातच सणाचा खरा आनंद आहे,’ हा संदेश देणारा हा संवेदनशील उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button