बायपासवरील अपघातात नागरिकाचा बळी; कंत्राटदार कंपनीविरुद्ध ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा


बायपासवरील अपघातात नागरिकाचा बळी; कंत्राटदार कंपनीविरुद्ध ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा
जळगाव : पाळधी-जळगाव नवीन महामार्गावरील अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर रस्ते बांधकामातील कथित निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध जळगाव तालुका पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधासह कलम 290, 3(5), मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019 मधील कलम 198-अ तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, 1984 मधील कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एक वर्षातच बायपासवरील ओव्हरब्रिजला तडे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर जळगाव शहरापासून सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतरावर पाळधी ते जळगाव असा नवीन बायपास मार्ग तयार करण्यात आला. या रस्त्याचे काम ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, सुमारे महिनाभरापूर्वी झालेल्या पहिल्याच पावसात या मार्गावरील ओव्हरब्रिजचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुलालगतची माती खचल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गाची एक लेन बंद करून वाहतूक दुसऱ्या लेनवरून सुरू ठेवली होती.
रात्री दोन वाहनांची धडक; एकाचा मृत्यू
३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे २ ते २.१५ वाजेच्या सुमारास पाळधी-जळगाव नवीन महामार्गावर ममुराबाद ते आसोदा बायपास (सर्व्हिस रोड) दरम्यान ट्रक क्रमांक MH 05 DK 5314 आणि तवेरा वाहन क्रमांक MH 48 P 0755 यांच्यात अपघात झाला.
या अपघातात तवेरा वाहनातील प्रवाशांना गंभीर तसेच किरकोळ दुखापती झाल्या. त्यापैकी शांताराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर, जि. जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी जखमी रामचंद्र ईश्वर महाजन (वय १९) यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २६१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्यात BNS कलम 106(1), 125(ए)(बी), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, रस्त्यावरील कथित निकृष्ट काम, ओव्हरब्रिजची झालेली हानी आणि अपघाताच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप करत पोलिसांत स्वतंत्रपणे कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, रात्रीच्या वेळी ओव्हरब्रिज परिसरात योग्य बॅरिकेडिंग, सूचना फलक आणि सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र, या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आणि त्यातून अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असतानाही नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
एमडी, जीएमसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा
या प्रकरणी ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता आणि संबंधित साइट अधिकारी यांना जबाबदार धरत त्यांच्याविरुद्ध गुन्हा क्र. २६२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात BNS कलम 105, 290, 3(5), मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019 मधील कलम 198-अ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 मधील कलम 3 व 4 लावण्यात आले आहेत.
काय आहे BNS कलम 105?
भारतीय न्याय संहितेतील कलम 105 हे खुनाच्या श्रेणीत न येणाऱ्या सदोष मनुष्यवधाशी संबंधित गंभीर कलम आहे. तर कलम 290 हे बांधकाम, पाडकाम किंवा दुरुस्तीच्या कामात निष्काळजीपणाशी संबंधित आहे. कलम 3(5) अंतर्गत समान उद्देशाने केलेल्या कृत्यासाठी सामूहिक जबाबदारीची तरतूद आहे.
या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार असून, रस्ते बांधकामातील गुणवत्ता व सुरक्षाव्यवस्थेबाबत पोलिस तपास महत्त्वाचा ठरणार आहे.







