SocialSpecial

४०८ संसार तुटण्यापासून वाचवणारा ‘भरोसा’!

जळगाव पोलिसांच्या महिला तक्रार निवारण कक्षाचे संवेदनशील कार्य चर्चेत; चार महिन्यांत १०५३ प्रकरणांवर काम

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर गुन्हे, तपास, अटक आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी उभी राहते. मात्र याच पोलीस दलामध्ये एक असा विभाग कार्यरत आहे, जो तुटलेली नाती जोडतो, अश्रूंना आधार देतो आणि अनेक महिलांना नव्याने जगण्याचा विश्वास देतो. जळगाव पोलिसांचा “भरोसा” महिला तक्रार निवारण कक्ष सध्या अशाच संवेदनशील कार्यामुळे चर्चेत आला आहे.

वाढते शहरीकरण, अणुकुटुंब पद्धती, कामाच्या वाढलेल्या वेळा, मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक, कौटुंबिक संवादाचा अभाव आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेक कुटुंबांमध्ये तणाव निर्माण होत आहे. अनेक महिला मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक त्रासाला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत “भरोसा” कक्ष महिलांसाठी आधारवड ठरत आहे. नुकतेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी याबाबत आढावा घेतला.

या कक्षामार्फत समुपदेशन, कायदेशीर मदत, पोलीस संरक्षण, वैद्यकीय सहाय्य, मानसोपचार सेवा तसेच तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिली जाते. विशेष म्हणजे, या सेवेमुळे अनेक कुटुंबांमध्ये पुन्हा संवाद निर्माण होऊन संसार वाचत असल्याचे समोर आले आहे.

४०८ प्रकरणांमध्ये समझोता घडवून आणण्यात यश
सन २०२६ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत जळगाव पोलिसांच्या भरोसा सेलने एकूण १०५३ प्रकरणांवर काम केले. यापैकी तब्बल ४०८ प्रकरणांमध्ये समझोता घडवून आणण्यात यश आले. म्हणजेच ४०८ कुटुंबांचे संसार तुटण्यापासून वाचले, अनेक मुलांचे आई-वडील पुन्हा एकत्र आले आणि अनेक महिलांना नव्याने जगण्याची उमेद मिळाली. तर १८३ प्रकरणांमध्ये समझोता न झाल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या ४६२ प्रकरणे प्रलंबित आहेत.

सहसा प्रकाशझोतात न येता काम
विशेष म्हणजे, हे कार्य करणाऱ्या महिला अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदारांचे काम सहसा प्रकाशझोतात येत नाही. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्या महिला आणि कुटुंबांच्या समस्या संयमाने ऐकून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा रडत आलेल्या महिलांना धीर देत त्यांच्या आयुष्यात पुन्हा स्थैर्य निर्माण करण्याचे मोठे काम या महिला अधिकारी करत आहेत.

भरोसा सेलमध्ये कार्यरत महिला अधिकारी व अंमलदार
म.पो.उप.निरीक्षक कल्याणी रविंद्र पाटील, श्रेणी पो.उप.निरीक्षक वैशाली तुकाराम महाजन, मपोहवा रत्ना दगडू मराठे, मपोहवा शोभा गोपीचंद धनगर, मपोहवा अश्विनी रामचंद्र खुरपे, मपोहवा श्रद्धा योगेश सोनवणे, मपोनां उपाली यशवंत खरे, मपोअं मंगला सुभाष तायडे.

समाजात पोलीस दलाबद्दल विश्वास आणि संवेदनशीलतेची भावना निर्माण करणारे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद मानले जात आहे. “भरोसा” हे केवळ नाव नसून, संकटात सापडलेल्या महिलांसाठी खऱ्या अर्थाने जगण्याचा आधार ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button