जळगावात आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
पाच आरोपी जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे ११ लाख ५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तारा बिझनेस पार्क परिसरात २३ एप्रिल २०२६ रोजी ही चोरी उघडकीस आली होती. घरमालक कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १२ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान ही टोळी मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेत अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निलेश उर्फ भुरा माहोरिया, ताराचंद सोलंकी, राकेश सोलंकी, गोविंद उर्फ छोटू आहेर आणि दिलीप मंगा माहोरिया यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ११ ग्रॅम चांदीचे दागिने आणि ५ लाख ७८ हजार रुपये रोख असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा मोठा भाग परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ किरण चौधरी, पोहेकॉ गिरीश पाटील, पोना मोतीलाल बोरसे, पोकॉ विशाल कोळी, पोकॉ रमाकांत साळुंखे, पोकॉ शशिकांत मराठे, पोकॉ नितीन ठाकुर, पोकॉ राहुल घेटे यांनी ही कामगिरी पार पाडली.






