Politics

जळगाव विधान परिषद निवडणूक : महायुतीचे नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविला. दि. १८ जून रोजी झालेल्या मतदानानंतर आज (२२ जून) मतमोजणी पार पडली. मतमोजणीत महाजन यांना तब्बल ५८२ प्रथम पसंतीची मते मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज झालेल्या मतमोजणीत एकूण ६११ वैध मतांची गणना करण्यात आली, तर ५ मते अवैध ठरली. जळगाव जिल्ह्यात ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. चाळीसगाव येथील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता.

मतमोजणीच्या अंतिम निकालानुसार महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना टेबल क्रमांक १ वर २०७, टेबल क्रमांक २ वर १९१ आणि टेबल क्रमांक ३ वर १८४ अशी एकूण ५८२ मते मिळाली. त्यांच्या तुलनेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार शरद शामराव तायडे यांना केवळ १७ मते मिळाली. अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांना ११ मते, तर अपक्ष उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांना अवघे १ मत मिळाले.

निवडणुकीतील एकूण वैध मतांपैकी सुमारे ९५ टक्क्यांहून अधिक मते महाजन यांच्या पारड्यात पडल्याने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील या निकालामुळे महायुतीने आपला गड कायम राखत विधान परिषदेत आणखी एक जागा आपल्या खात्यात जमा केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button