तुंबलेल्या गटारी, वाढलेले गवत अन् अतिक्रमण; महापौरांनी स्वच्छता निरीक्षकांना धरले धारेवर! वॉर्ड क्रमांक २ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी; गलथान कारभार सुधारण्याचे निर्देश, तक्रारींच्या तातडीच्या निवारणाचे आदेश जळगाव, प्रतिनिधी : शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) वॉर्ड क्रमांक २ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात अनेक ठिकाणी तुंबलेल्या गटारी, रस्त्यांवरील वाढलेले गवत, अतिक्रमण आणि बांधकामाचे साहित्य पडून असल्याचे निदर्शनास आले. स्वच्छतेतील त्रुटींवर नाराजी व्यक्त करत महापौरांनी संबंधित स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने महापौरांनी पाहणीदरम्यान नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वॉर्डात सध्या ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. घंटागाडीचा संप सुरू असल्याने स्वच्छतेच्या कामासाठी दोन जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, तुंबलेल्या गटारी आणि लहान गल्ल्यांमधील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित विभागाला दिले. जोगी नगर परिसरातील गटारींवर झालेले अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांधकामानंतरचे वेस्ट मटेरियल रस्त्यावर टाकल्याचे आढळल्याने संबंधितांना तातडीने नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले. रस्त्यांवर वाढलेले गवत काढणे, तसेच नागरिकांच्या मागणीनुसार जुन्या दिव्यांच्या जागी नवीन पथदिवे बसविण्याच्या सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या. पुलाखालील अतिक्रमण आणि अस्वच्छतेबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत संबंधित जागा तातडीने स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांनी ड्रेनेज कनेक्शन त्वरित घ्यावे, असे आवाहनही महापौरांनी केले. न्यू सीखवाल नगर परिसरातील तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. वॉर्डातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक निकम आणि त्यांच्या पथकाने दैनंदिन कामाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश महापौरांनी दिले. तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी करण्यासाठी हजेरी रजिस्टर सादर करण्यास सांगण्यात आले. कामकाजात शिस्त राखून स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक विजय बांदल, सागर सोनवणे, पूजा विजय जगताप, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता जितेंद्र रंधे, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, विद्युत विभागाचे सुमित पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यावर महापौरांनी या दौऱ्यात भर दिला.

तुंबलेल्या गटारी, वाढलेले गवत अन् अतिक्रमण; महापौरांनी स्वच्छता निरीक्षकांना धरले धारेवर!
वॉर्ड क्रमांक २ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी; गलथान कारभार सुधारण्याचे निर्देश, तक्रारींच्या तातडीच्या निवारणाचे आदेश
जळगाव, प्रतिनिधी : शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) वॉर्ड क्रमांक २ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात अनेक ठिकाणी तुंबलेल्या गटारी, रस्त्यांवरील वाढलेले गवत, अतिक्रमण आणि बांधकामाचे साहित्य पडून असल्याचे निदर्शनास आले. स्वच्छतेतील त्रुटींवर नाराजी व्यक्त करत महापौरांनी संबंधित स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने महापौरांनी पाहणीदरम्यान नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वॉर्डात सध्या ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. घंटागाडीचा संप सुरू असल्याने स्वच्छतेच्या कामासाठी दोन जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, तुंबलेल्या गटारी आणि लहान गल्ल्यांमधील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित विभागाला दिले.
जोगी नगर परिसरातील गटारींवर झालेले अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांधकामानंतरचे वेस्ट मटेरियल रस्त्यावर टाकल्याचे आढळल्याने संबंधितांना तातडीने नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले. रस्त्यांवर वाढलेले गवत काढणे, तसेच नागरिकांच्या मागणीनुसार जुन्या दिव्यांच्या जागी नवीन पथदिवे बसविण्याच्या सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या. पुलाखालील अतिक्रमण आणि अस्वच्छतेबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत संबंधित जागा तातडीने स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले.
नागरिकांनी ड्रेनेज कनेक्शन त्वरित घ्यावे, असे आवाहनही महापौरांनी केले. न्यू सीखवाल नगर परिसरातील तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. वॉर्डातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक निकम आणि त्यांच्या पथकाने दैनंदिन कामाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश महापौरांनी दिले. तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी करण्यासाठी हजेरी रजिस्टर सादर करण्यास सांगण्यात आले. कामकाजात शिस्त राखून स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात नगरसेवक विजय बांदल, सागर सोनवणे, पूजा विजय जगताप, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता जितेंद्र रंधे, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, विद्युत विभागाचे सुमित पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यावर महापौरांनी या दौऱ्यात भर दिला.







