केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन; पालकमंत्र्यांच्या निवासावर मोर्चाचा इशारा

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन; पालकमंत्र्यांच्या निवासावर मोर्चाचा इशारा
जळगाव, जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, हक्काचा केळी पीकविमा तसेच सरसकट कर्जमाफी तत्काळ देण्यात यावी, अन्यथा पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे समन्वयक प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.
गुरुवार (दि. २५ जून २०२६) रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. त्यामध्ये शेतात केळी पीक उभे असतानाही पीकविमा प्रस्ताव नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
तसेच अनेक शेतकऱ्यांच्या पीकविमा क्षेत्रात कोणतीही पडताळणी न करता बदल करण्यात आल्याचा आरोप करत, पूर्वी मंजूर असलेले क्षेत्र पुन्हा पूर्ववत करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये अनुदान देण्यात यावे, तसेच खरीप पीकविमा योजना पूर्वीप्रमाणे पाच निकषांवर लागू करावी, अशीही मागणी करण्यात आली. यासोबतच केळी उत्पादक शेतकऱ्यांचा माल खरेदी करणारे व्यापारी परवानाधारक असावेत, अशी मागणीही करण्यात आली.
या सर्व मागण्या न्याय्य असून त्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि संदीप पाटील यांनी दिला.
या आंदोलनात प्रमोदभाऊ घुगे, प्रदीप पाटील, योगेश पाटील, लोटन सोनवणे, अशोक पाटील, अजित पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश सावळे, अनिल धनगर, राजूदादा नवल यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.






