Other

ब्रेकिंग : जळगाव एमआयडीसीत भीषण आग, दोन कंपन्या भस्मसात; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहराच्या औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) ‘जे’ सेक्टरमध्ये शनिवारी दुपारी भीषण आगीची घटना घडली. भारत गॅस गोदामाच्या समोर असलेल्या दोन नामांकित कंपन्यांना अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की, संपूर्ण शहरातून धुराचे लोट पाहायला मिळत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील ‘जे’ सेक्टरमध्ये असलेल्या ‘जे ब्रदर्स’ आणि ‘श्री एंटरप्रायझेस’ या दोन कंपन्यांना दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. जे ब्रदर्स कंपनीत खोबरेल तेल आणि इतर सुगंधी तेलांचे पॅकिंग केले जाते, तर शेजारील श्री एंटरप्रायझेसमध्ये प्लास्टिकच्या चटया तयार करण्याचे काम चालते. या दोन्ही कंपन्यांमध्ये ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण केले.

स्फोटांच्या आवाजांनी घबराट
आग लागल्यानंतर कंपन्यांमधून स्फोटांचे मोठे आवाज ऐकू येत होते. तेलाचे डबे आणि रसायनांच्या पिंपांमुळे हे स्फोट होत असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आवाजांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

युद्धपातळीवर मदतकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असून आतापर्यंत अग्निशमन दलाचे ६ बंब रिकामे झाले आहेत. आगीची तीव्रता पाहता, समोरच असलेल्या भारत गॅस गोदामातून पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

मोठ्या नुकसानीची भीती
या आगीत दोन्ही कंपन्यांमधील कच्चा माल, यंत्रसामग्री आणि तयार साठा जळून खाक झाला असून कोट्यवधींच्या नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र उष्णता किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button