जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा मास्टरस्ट्रोक! तीन जागांवर महिला उमेदवार बिनविरोध
शिवसेनेच्या दोन, तर भाजपच्या एका जागेचा समावेश

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा मास्टरस्ट्रोक! तीन जागांवर महिला उमेदवार बिनविरोध
शिवसेनेच्या दोन, तर भाजपच्या एका जागेचा समावेश
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने सुरुवातीलाच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यानंतर पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या तीन सोसायटी मतदारसंघांतील जागा बिनविरोध झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या तिन्ही जागांवर राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांच्या पत्नींची बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणात महिला नेतृत्वाची एन्ट्री झाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला होता. निर्धारित मुदतीनंतर पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या तीन मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली. यामध्ये शिवसेनेच्या दोन, तर भाजपच्या एका जागेचा समावेश आहे.
पाटील कुटुंबातील दोन महिलांची बाजी
पारोळा सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी नलिनी चिमणराव पाटील यांनी बिनविरोध निवड मिळवली आहे. तर एरंडोल सोसायटी मतदारसंघातून आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल अमोल पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. एकाच राजकीय घराण्यातील दोन महत्त्वाच्या महिला चेहऱ्यांना जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळाल्याने या निकालाची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली आहे.
सावकारे कुटुंबाचेही जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व
दुसरीकडे, भुसावळ सोसायटी मतदारसंघातून राज्यमंत्री तथा भाजप नेते संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताई संजय सावकारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सावकारे कुटुंबाचेही जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्व कायम राहणार आहे.
महायुतीची विजयी सलामी; पुढील लढतीकडे लक्ष
या तीन जागांवरील बिनविरोध निवडीमुळे महायुतीने जिल्हा बँक निवडणुकीत विजयी सलामी दिली आहे. राजकीयदृष्ट्या प्रभावशाली कुटुंबांतील महिलांना मिळालेली संधी आणि तीन जागांवरील बिनविरोध यश यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
आता उर्वरित मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहतात, कोण माघार घेतात आणि कोणत्या जागांवर थेट लढती रंगतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी घडामोडींमधून जळगाव जिल्हा बँकेच्या सत्तेचे अंतिम राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.







