जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? सतीश पाटलांच्या उमेदवारीने राजकीय चर्चांना उधाण!
शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षवेधी; भाजप आणि शिंदे गटाच्या रणनीतीकडे लक्ष

जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? सतीश पाटलांच्या उमेदवारीने राजकीय चर्चांना उधाण!
शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षवेधी; भाजप आणि शिंदे गटाच्या रणनीतीकडे लक्ष
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पदाधिकारीही उपस्थित असल्याने दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घडामोडींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय गणितांची नव्याने मांडणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने राजकीय संकेत?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी डॉ. सतीश पाटील, त्यांच्या पत्नी रेखा पाटील आणि पुत्र रोहन पाटील यांनी अर्ज सादर केले. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील आणि जिल्हा समन्वयक विकास पवार यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. दरम्यान, कल्पिता पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
दोन्ही गटांतील पदाधिकारी एकाचवेळी उपस्थित राहिल्याने ही केवळ योगायोगाने घडलेली भेट होती की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय समीकरणे जुळवली जात आहेत, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र, दोन्ही गटांनी एकत्रित निवडणूक लढविण्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसल्याने संभाव्य युतीबाबत अद्याप स्पष्टता नाही.
राष्ट्रवादीची एकी भाजप-शिंदे गटाची चिंता वाढवणार?
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्वतंत्र गट कार्यरत असले, तरी सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये स्थानिक राजकीय हितसंबंध आणि सत्तेची गणिते महत्त्वाची ठरतात. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही गटांनी एकत्रित भूमिका घेतल्यास त्याचा परिणाम अन्य पक्षांच्या रणनीतीवर होऊ शकतो. विशेषतः भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला संभाव्य राजकीय आव्हानाचा विचार करून आपली रणनीती आखावी लागू शकते, अशी चर्चा आहे.मात्र, भाजप किंवा शिंदे गटाकडून या घडामोडींवर अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
स्वतंत्र पॅनल की नव्या आघाडीची जुळवाजुळव?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट स्वतंत्रपणे मैदानात उतरणार की स्थानिक पातळीवर एकत्र येऊन नवे राजकीय समीकरण तयार करणार, याकडे आता लक्ष लागले आहे. विविध पक्षांतील नेत्यांच्या हालचाली, उमेदवारी अर्ज आणि संभाव्य जागावाटप यामुळे निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.आगामी काळात कोणते नेते कोणाच्या बाजूने उभे राहतात, कोणत्या गटांमध्ये समन्वय घडतो आणि पॅनलची अंतिम रचना कशी होते, यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सतीश पाटील यांच्या उमेदवारीनंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांचे रूपांतर प्रत्यक्ष युतीत होणार की प्रत्येक गट स्वतंत्रपणे आपली ताकद आजमावणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







