लोकसंवाद कार्यक्रमातून नागरिकांना दिली शासकीय योजनांची माहिती महसूल योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन


लोकसंवाद कार्यक्रमातून नागरिकांना दिली शासकीय योजनांची माहिती
महसूल योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव, ‘लोकसंवाद २०२६’ अभियानांतर्गत पाचोरा येथील महाराजा गणेश मंडळाच्या गणेशोत्सव देखाव्यास भेट देणाऱ्या नागरिकांना महसूल विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार विजय बनसोडे यांच्या समन्वयातून नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करून पात्र लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
‘जीवंत सातबारा’ मोहिमेंतर्गत मृत खातेदारांच्या वारसांची नावे अधिकार अभिलेखात नोंदवून सातबारा उतारा अद्ययावत करून घेण्याचे, तसेच प्रत्येक शेतकऱ्याने ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. ई-पीक पाहणीसाठी गावनिहाय सहाय्यक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पीएम-किसान योजनेतील प्रलंबित भूमी अभिलेख जोडणीची (लँड सीडिंग) कामे पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू असून, ‘ॲग्रीस्टॅक’अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. ओळख क्रमांक अभावी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात त्यामुळे सर्वांनी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) नोंदवून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान प्रलंबित प्रकरणे व फेरफार नोंदी निकाली काढण्यासाठी महसूल अदालती व फेरफार अदालती आयोजित करण्यात येत आहेत. तसेच शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, डीएलसी प्रमाणपत्र, वारस नोंद व पीएम-किसान योजनेसाठी गावनिहाय शिबिरे घेण्यात येत आहेत. शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांनी नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.
अभियानाच्या यशस्वितेसाठी नायब तहसीलदार विनोद कुमावत, प्रतिभा राजपूत, महसूल सहायक शुभम सपकाळे, सहायक महसूल अधिकारी भरत परदेशी यांनी परिश्रम घेतले.
******







