मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी जळगाव महानगरपालिकेची व्यापक कारवाई; घरभेटी, धूर फवारणी, कंटेनर सर्वेक्षण व जनजागृतीला वेग

मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी जळगाव महानगरपालिकेची व्यापक कारवाई; घरभेटी, धूर फवारणी, कंटेनर सर्वेक्षण व जनजागृतीला वेग
जळगाव, दि. २८जुलै २०२६ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया व इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरभर विशेष प्रतिबंधात्मक मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पंप फवारणी, धूर फवारणी (फॉगिंग), कंटेनर सर्वेक्षण, घरभेटी, डासांच्या अळ्यांचा शोध, अळीनाशक उपाययोजना तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येत आहे
महानगरपालिकेने शहरातील सर्व १९ प्रभागांसाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करून दोन टप्प्यांत पंप फवारणीचे काम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक १ ते ९ मधील पंप फवारणीचे काम पूर्ण झाले असून प्रभाग क्रमांक १० मध्ये काम सुरू आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात प्रभाग क्रमांक ११ ते १९ मधील पंप फवारणी पूर्ण झाली असून पुढील फेरीचे कामही नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आले आहे.
डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये धूर फवारणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत राज मालती नगर, समाबाई आंबेडकर नगर, खडके चाळ, गेंडालाल मिल, लक्ष्मी नगर, सिटी कॉलनी, शिवाजी नगर, हमाल वाडा, घरकुल, चोघुले प्लॉट, कांचन नगर, प्रशांत चौक, विलास चौक, रेल्वे लाईन, वाल्मीक नगर, जैनाबाद, मेक्सिको माता नगर, तानाजी मालुसरे नगर, वडामळा, आसोदा रोड, गोपाळपुरा, श्रीकृष्ण नगर, खेडी पाटील वाडा, आंबेडकर नगर, इंदिरा नगर, गुरुनानक नगर, मोची वाडा, कट्या फेल, ओक नगर, चंदन वाडी, लिंबू वाडा, गवळी वाडा, भिलपुरा, बालाजी पेठ, बागवान वाडा, जोशी पेठ, मराठी पेठ, रामपेठ, भोंईटे गल्ली, कोळीवाडा, चौधरी वाडा, इस्लामपुरा, भवानी पेठ, तंट्या भिल सोसायटी, तुकाराम वाडी, जानकी नगर, कासमवाडी, पांचाळ चाळ, शाह नगर, मिस्त्रीवाडा, दंगलग्रस्त कॉलनी, गणेश नगर, संपूर्ण पिंप्राळा गावठाण, निमखेडी, संपूर्ण खेडीखुर्द नगर, डांगेकर नगर, ताज नगर, आझाद नगर, संपूर्ण घरकुल परिसर, म्युनिसिपल कॉलनी, राजू गांधी नगर, भात वाडा, बडर वाडा, तळवी वाडा, हरीविठ्ठल नगर, समता नगर, धामणगाव वाडा, बंजारी टेकडी, तांबापुरा, फुकटपुरा, राम रहीम नगर, गुलाब बाबा कॉलनी, मारूम वाडी, सय्यद अन्सार नगर, सम्राट कॉलनी, नाशे वाडा, कंजर वाडा, संजय गांधी नगर, जोशी कॉलनी, बाबा नगर, विठ्ठल पेठ, बदाम गल्ली, बुनकर वाडा, खेडीवाडी, गाय वाडा, कोतिक नगर, संपूर्ण मेहरूण गावठाण, फिरसादे वाडा, बॉम्बे वाडा, राजा कॉलनी, दत्त नगर, सुप्रीम कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, उस्मानिया नगर, नियाजअली नगर, जळगाव कट्ट्याच्या मागील भाग, मिल्लत कॉलनी, रेणुका नगर, सिद्धार्थ नगर, शांती नारायण नगर व नागसेन नगर या परिसरात धूर फवारणी करून डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्याचे काम करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी शहरभर व्यापक कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबविली. दिनांक २४ जुलै २०२६ पर्यंत ४७,७०६ घरांना भेटी देण्यात आल्या. या सर्वेक्षणादरम्यान १,३३० घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या, तर १,३६,९१४ पाण्याची भांडी व विविध प्रकारच्या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,७९९ कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या. तसेच ९९,००७ अनुपयोगी पाण्याची भांडी व कंटेनर रिकामे करण्यात आले, तर २,३०८ पाण्याची भांडी रिकामी करून डासांची पैदास रोखण्यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत
मलेरिया व डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध भागात माहितीपत्रके (ब्रॉशर) वाटप करण्यात आले. या माहितीपत्रकांद्वारे घर व परिसरात पाणी साचू न देणे, आठवड्यातून एक दिवस “ड्राय डे” पाळणे, पाण्याच्या टाक्या व कुलर नियमित स्वच्छ ठेवणे, निरुपयोगी टायर, डबे, फुलदाण्या व इतर वस्तूंमध्ये पाणी साचू न देणे, मच्छरदाणीचा वापर करणे तसेच ताप किंवा डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी डासांची पैदास रोखण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा, हा संदेश या अभियानातून देण्यात आला.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, फवारणी पथके व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत असून प्रत्येक प्रभागात नियमित घरभेटी, अळी शोध मोहीम, धूर फवारणी, पंप फवारणी व जनजागृतीचे काम सुरू आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. आदित्य जिवने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेस सर्व नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे. आपल्या घरात, अंगणात, गच्चीवर व परिसरात पाणी साचू देऊ नये. पाण्याच्या टाक्या, कुलर, टायर, फुलदाण्या व इतर पाणीसाठे नियमित स्वच्छ ठेवावेत. महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक व कर्मचारी घरभेटी, कंटेनर सर्वेक्षण, पंप फवारणी व धूर फवारणीसाठी येत असताना त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास तात्काळ शासकीय आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. ‘स्वच्छ परिसर – निरोगी जळगाव’ हे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच साध्य होईल.”







