
भांडवलशाहीच्या विळख्यात अडकलेली आरोग्यसेवा -डॉ. विलास भोळे
लहान हॉस्पिटल्सच्या अस्तित्वासाठी सुरु आहे झगड्याची लढाई
जळगाव (प्रतिनिधी):
मागील काही वर्षांपासून शासनाच्या धोरणांमध्ये मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्सना प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पारंपरिक फॅमिली फिजिशियन आणि लहान हॉस्पिटल्सच्या संकल्पनेला हळूहळू गळती लागल्याचे निरीक्षण आय.एम.ए. महाराष्ट्रचे माजी उपाध्यक्ष आणि कृती समितीचे चेअरमन डॉ. विलास भोळे यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. भोळे यांच्या मते, लहान हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना घरच्यासारखी वागणूक, तातडीने उपचार आणि कमी खर्चात सुविधा मिळतात. परंतु कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये उपचारापेक्षा आर्थिक गणित महत्त्वाचे ठरते. ही स्थिती रुग्णांच्या हितासाठी धोकादायक आहे.
लहान हॉस्पिटल्ससमोरील प्रमुख अडचणी
लहान हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे व परवानग्या इतक्या क्लिष्ट झाल्या आहेत की डॉक्टर मंडळी त्याकडे पाठ फिरवत आहेत.विविध शासकीय अधिकाऱ्यांकडून लाच मागितली जाते. या दबावाखाली अनेक हॉस्पिटल्स झुकतात किंवा आपले दरवाजे कायमचे बंद करतात.
आजकाल हॉस्पिटल्सकडून ऍडव्हान्स घेण्याची सक्ती वाढली आहे. जेवढं हॉस्पिटल मोठं, तेवढा ऍडव्हान्स रक्कमही मोठी, हे वास्तव रुग्णांसाठी अधिक त्रासदायक बनले आहे. अपुरी संसाधने आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे सरकारी आरोग्यसेवा विश्वासार्ह ठरत नाही. परिणामी, खासगी हॉस्पिटल्स हेच पर्याय उरतात.
रुग्णहितासाठी सुचवलेले उपाय- लहान हॉस्पिटल्सना प्रोत्साहन द्यावे.नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि किफायतशीर करावी. भ्रष्टाचारावर कठोर कारवाई व्हावी.रुग्ण व हॉस्पिटल दोघांच्याही हिताासाठी न्याय्य कायदे लागू करावेत.
“लहान हॉस्पिटल्स बंद पडल्यास, सामान्य रुग्णाला उपचार घेणे अवघड होईल. शासनाने धोरणांचा पुनर्विचार करावा आणि आरोग्यसेवा भांडवलदारांच्या ताब्यात जाण्याऐवजी ती सर्वसामान्यांसाठी खुली व परवडणारी ठेवावी,” अशी ठाम भूमिका डॉ. विलास भोळे यांनी व्यक्त केली.