Other

जळगाव ते पंढरपूर सायकल वारीचे प्रस्थान; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी सहभागी !

जळगाव ते पंढरपूर सायकल वारीचे प्रस्थान; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी सहभागी !

तीन दिवसात करणार सायकलीने ४८५ किमीचा प्रवास

जळगाव : जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. आज, गुरुवार दिनांक ९ जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता आकाशवाणी चौकातून या वारीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. विशेष म्हणजे, जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीमध्ये सहभाग घेतला आहे.

*४८५ किमीचा प्रवास आणि जळगावकरांचा जल्लोष*
एकूण ४८५ किलोमीटरचे अंतर पार करून हा सायकलिस्ट ग्रुप शनिवार, दिनांक ११ जुलै रोजी संध्याकाळी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. आज सकाळी महापौर दीपमाला काळे यांच्यासह सर्व सायकलिस्ट सदस्यांना निरोप देण्यासाठी जळगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित महिला भगिनींनी सर्व सदस्यांचे औक्षण केले आणि जळगावकरांनी त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर अत्यंत उत्साही वातावरणात सर्वजण पंढरपूरकडे रवाना झाले.

*सुदृढ आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश – महापौर दीपमाला काळे*

या सायकल वारीच्या निमित्ताने महापौर दीपमाला काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आस प्रत्येक वारकऱ्याला असते. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी दि. ९ ते ११ जुलै २०२६ दरम्यान जळगाव ते पंढरपूर हा प्रवास सायकलने करण्याचा संकल्प मी केला आहे. माऊलींच्या चरणी सायकल वारी करण्याचे हे माझे सलग दुसरे वर्ष असून माझ्यासाठी ही केवळ धार्मिक वारी नसून, एक सामाजिक आणि आरोग्यविषयक संदेश देणारी चळवळ आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, गेल्या १५३ दिवसांत जळगाव शहराची प्रथम नागरिक म्हणून काम करताना त्यांनी ‘आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण’ या गोष्टींना नेहमीच प्राधान्य दिले आहे. सायकल चालवण्यामुळे आपले आरोग्य तर उत्तम राहतेच, शिवाय इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे रक्षण होते, हाच संदेश त्यांना या वारीतून संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचा आहे.

*विठ्ठल चरणी साकडे*
“विठ्ठलाच्या चरणी लीन होताना, मी संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या समृद्धीसाठी, शेतकरी बांधवांच्या सुखासाठी आणि जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठी साकडे घालणार आहे. जळगावला स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी आम्ही जे ‘विकास व्हिजन’ हाती घेतले आहे, त्याला बळ मिळावे हीच विठ्ठल चरणी प्रार्थना असेल,” असा विश्वासही महापौर काळे यांनी व्यक्त केला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button