Other

शाळा-महाविद्यालयांजवळील जंकफूड व अतिक्रमणाविरोधात महापौर आक्रमक

शाळा-महाविद्यालयांजवळील जंकफूड व अतिक्रमणाविरोधात महापौर आक्रमक

५० मीटर परिसरातील जंकफूड विक्री बंद करण्यासाठी कारवाईची आयुक्तांना सूचना

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमित जंकफूड स्टॉल्स, हॉटेल्स तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात महापौर दीपमाला मनोज काळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीने विशेष मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्याची आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महापौर काळे यांनी दिलेल्या निवेदनात शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांजवळ अतिक्रमण करून सोयाबीन बिर्याणी, अंडा बिर्याणी, नाश्ता, चहा तसेच इतर जंकफूड विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून परिसरात सिगारेट, गुटखा, तंबाखू आदी पदार्थांचीही सर्रास विक्री होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

महापौरांनी शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या निर्णयाचा उल्लेख करत, शाळा व महाविद्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात प्रक्रिया केलेले पदार्थ, जंकफूड विक्री आणि त्याच्या जाहिरातींना बंदी असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

यामुळे महानगरपालिकेने विशेष पथक स्थापन करून शहरभर मोहीम राबवावी, प्रतिबंधित जंकफूड व्यवसाय व अंमली पदार्थांची विक्री तात्काळ बंद करावी, अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवावीत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महापौर दीपमाला काळे यांनी केली आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button