जळगावात फिल्मी थरार! नाकाबंदी तोडून चोरीच्या’ कारचा पोलिसांनी थरारक पाठलाग करून चालकाच्याआवळल्या मुसक्या

जळगावात फिल्मी थरार! नाकाबंदी तोडून चोरीच्या’ कारचा पोलिसांनी थरारक पाठलाग करून चालकाच्याआवळल्या मुसक्या
’एमआयडीसी’च्या जाबांज पोलिसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी): गुजरात मधील अहमदाबाद येथून चोरी झालेली ९ लाख रुपये किमतीची आलिशान किया कंपनीची कार जळगाव एमआयडीसी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जप्त केली आहे. नाकाबंदी दरम्यान पोलिसांना हुलकावणी देऊन भरधाव वेगाने पळणाऱ्या या कारला पोलिसांनी अजिंठा चौफुलीवर अडवले. या कारवाईत चोरीच्या कारसह संशयित चालकालाही ताब्यात घेण्यात आले असून ही गुप्त माहिती मिळताच अवघ्या काही तासांत ही कारवाई करण्यात आली.
बोपल पोलिसांच्या एका फोनमुळे यंत्रणा सतर्क:
गुजरातच्या अहमदाबाद ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या बोपल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी ग्रे रंगाची ‘किया कॅरेन्स’ (Kia Carens) कार (क्र. MP 04 ZL-5155) चोरी झाली होती. याप्रकरणी तेथे गुन्हा दाखल होता. दरम्यान, ही चोरीची कार १८ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता नशिराबाद टोल नाका क्रॉस करून जळगाव शहराच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती बोपल पोलिसांनी जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले.
काशिनाथ चौकात नाकाबंदी तोडली अन्…
माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक अंमलदार पोहेकॉ. संदीप सपकाळे, पोकॉ. रमेश अहिरे आणि पोकॉ. अफजल बागवान यांनी सायंकाळी ७:१५ वाजता काशिनाथ चौकात नाकाबंदी लावली. काही वेळातच संशयित कार येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा केला, मात्र चालकाने कारचा वेग वाढवून नाकाबंदी तोडली आणि अजिंठा चौफुलीच्या दिशेने कार पळवली
अजिंठा चौफुलीवर अडवले:
कार पळताच पोकॉ. रमेश अहिरे आणि पोकॉ. अफजल बागवान यांनी आपल्या दुचाकीवरून कारचा थरारक पाठलाग सुरू केला. अखेर अजिंठा चौफुलीवरील हिरो होंडा शोरुमसमोर पोलिसांनी कारला गराडा घालून थांबवले. कार चालकाकडे अधिक चौकशी केली असता ती अहमदाबाद येथून चोरी झालेली कार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कार व चालकाला एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. यानंतर १९ जून रोजी अहमदाबादचे बोपल पोलीस जळगावात दाखल झाले आणि ९ लाखांची कार व चालकाला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप सपकाळे, रमेश अहिरे आणि अफजल बागवान यांनी केली.






