मोहाडी महिला व बाल रुग्णालयात दोन शस्त्रक्रिया यशस्वी
गरजू रुग्णांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मोहाडी महिला व बाल रुग्णालयात दोन शस्त्रक्रिया यशस्वी
गरजू रुग्णांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव: जिल्हा महिला व बाल रुग्णालय (मोहाडी), जळगाव येथे दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी हृदयाच्या झडपेचा आजार असलेल्या महिला रुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
प्रसूतीसाठी दाखल झालेल्या या महिला रुग्णाची शस्त्रक्रिया रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश नाईक व भूलतज्ज्ञ डॉ. गणेश भारुळे यांच्या देखरेखीखाली सुरळीतपणे पार पडली.
तसेच, मूत्रपिशवीला चिकटलेली गर्भपिशवीचा विकार असलेल्या एका रुग्णावर दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. प्रशांत भारंबे व भूलतज्ज्ञ डॉ. गणेश भारुळे यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली.
या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह परिसेविका व अधिपरिचारिका वर्गाने सहकार्य केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन सांगळे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी केले आहे.







