मांडळ येथील २०० वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्या!
मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे डॉ. दीपक पाटील यांची मागणी

मांडळ येथील २०० वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्या!
मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे डॉ. दीपक पाटील यांची मागणी
पांझरा नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था, पाणीगळतीमुळे ग्रामस्थ चिंतेत
अमळनेर I महा पोलीस न्यूज तालुक्यातील मांडळ गावाजवळ पांझरा नदीवर असलेल्या सुमारे २०० वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन दगडी बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. बंधाऱ्याला ठिकठिकाणी तडे गेल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असून, बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी सभापती तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मांडळ येथील पांझरा नदीवरील हा ब्रिटिशकालीन दगडी बंधारा सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. बंधाऱ्याच्या खालून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून, सोबत वाळूही खड्ड्यांमधून बाहेर वाहून जात आहे. मांडळ, वावडे, जवखेडा यांसारख्या परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी या बंधाऱ्यामुळे पाण्याने भरलेल्या राहतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळतो.
मात्र, बंधारा फुटल्यास त्यातील संपूर्ण वाळू वाहून जाण्याची तसेच परिसरातील विहिरी कोरड्या पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यंदा भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
बंधाऱ्याची संपूर्ण दुरुस्ती करून त्यावर दोन फूट उंचीचे काँक्रीट टाकल्यास मोठ्या प्रमाणात पाणीसाठा अडविणे शक्य होईल. त्यामुळे परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. म्हणून शासनाने या कामासाठी तातडीने निधी मंजूर करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी विनंती डॉ. दीपक पाटील यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती लघु पाटबंधारे विभाग, धुळे तसेच जिल्हाधिकारी, धुळे यांनाही माहितीस्तव देण्यात आल्या आहेत. आता जलसंपदा मंत्री या मागणीची कितपत दखल घेतात आणि बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देतात, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.







