
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय बदलीचे आदेश जारी केले असून, चार पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU), शनीपेठ पोलीस ठाणे आणि बोदवड पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदाचा समावेश आहे.
कोणाची कुठे झाली बदली?
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पुढीलप्रमाणे बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक आशिष मधुकर लव्हंगले – बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आशिष लंडकळे यांची आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक विशाल प्रभुलाल जयस्वाल – शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी (कामकाज) म्हणून कार्यरत असलेल्या विशाल जयस्वाल यांची AHTU, जळगाव येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक नितीन सुदाम पाटील – आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नितीन पाटील यांची शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद दत्तात्रय राळेभात – बोदवड पोलीस ठाण्यात दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विवेकानंद राळेभात यांची बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
माधुरी बोरसे AHTUच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त
या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, मानव संसाधन विभाग, जळगाव यांना AHTU प्रभारी अधिकारी या पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांनी यापुढे मानव संसाधन विभाग, जळगाव येथे आपल्या मूळ पदाचे पूर्णवेळ कामकाज करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनाही शनीपेठ पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.
तात्काळ हजर राहण्याचे निर्देश
बदली आदेशातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी अथवा नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ कर्तव्यावर हजर राहून अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने जनहित, प्रशासकीय कारणे तसेच कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी लक्षात घेऊन हे फेरबदल करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. या आदेशावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची स्वाक्षरी आहे.






