जळगाव जिल्हा बँकेच्या नऊ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात
१२ जागा बिनविरोध; सहकार पॅनल विरुद्ध शेतकरी पॅनलमध्ये चुरस

जळगाव जिल्हा बँकेच्या नऊ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात
१२ जागा बिनविरोध; सहकार पॅनल विरुद्ध शेतकरी पॅनलमध्ये चुरस
महा पोलीस न्यूज I चेतन वाणी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील राजकीय चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. चिन्हवाटपानंतर नऊ जागांसाठी २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, २१ संचालकांच्या जागांपैकी १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित नऊ जागांवरील लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महायुतीचे ‘सहकार पॅनल’ विरुद्ध काँग्रेस आणि शेतकरी संघटनेचे ‘शेतकरी पॅनल’ अशी प्रमुख लढत रंगणार असल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापले आहे.
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले. जागावाटप, उमेदवारी आणि स्थानिक राजकीय समीकरणे जुळविताना काही मतदारसंघांत यश आले; मात्र काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी माघार न घेतल्याने निवडणूक अटळ झाली.
बिनविरोध झालेल्या १२ जागांमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता उर्वरित नऊ जागांवरील लढती अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत.
रक्षा खडसेंसमोर देवयानी देशमुख यांचे आव्हान
मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थक देवयानी चंद्रकांत देशमुख यांनीही माघार न घेतल्याने या मतदारसंघात थेट लढत होणार आहे. महायुतीतील घटकांशी संबंधित स्थानिक राजकीय समीकरणांमुळे या लढतीची विशेष चर्चा आहे.
चाळीसगावात मंगेश चव्हाण यांच्याविरोधात दोन उमेदवार
चाळीसगाव विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात नारायण नथू पाटील आणि विजय पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे. यावल, रावेर, महिला प्रतिनिधी, ओबीसी तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माघार न घेतल्याने या मतदारसंघांतील लढतींकडेही लक्ष लागले आहे.
चिन्हवाटपानंतर प्रचाराला वेग
चिन्हवाटपानंतर उमेदवारांना प्रचारासाठी स्वतंत्र चिन्हे मिळाली आहेत. कपबशी, ट्रॅक्टर, नारळ, छत्री, शिट्टी, बॅट आणि चष्मा यांसारख्या चिन्हांवर मतदारांना मतदान करावे लागणार आहे. काही मतदारसंघांत एकाच चिन्हावर वेगवेगळ्या उमेदवारांची नावे असल्याने प्रचारादरम्यान उमेदवाराचे नाव आणि मतदारसंघाची ओळख ठळकपणे मतदारांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी १२ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित नऊ जागांवर राजकीय प्रतिष्ठेची लढाई रंगणार आहे. महायुतीने एकत्रित ताकद पणाला लावली असली, तरी स्थानिक नाराजी, बंडखोरी आणि मतदारसंघनिहाय राजकीय समीकरणांचा निकालावर काय परिणाम होतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.







