Other

पावसाळ्यातील साथीच्या आजारांबाबत आरोग्य यंत्रणा मिशन मोडवर; करिश्मा नायर यांचे निर्देश

पावसाळ्यातील साथीच्या आजारांबाबत आरोग्य यंत्रणा मिशन मोडवर; करिश्मा नायर यांचे निर्देश

जळगाव (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने मिशन मोडवर काम करावे, तसेच एचपीव्ही लसीकरण आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात गुरुवारी (दि. २५) आयोजित आरोग्य विभागाच्या कार्यकारी सभेत त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा व निर्देशांकांचा आढावा घेताना करिश्मा नायर यांनी पावसाळ्यात दूषित पाणी, डासांची वाढ आणि अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, अतिसार व तापासारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवून संशयित रुग्णांची तातडीने नोंद, तपासणी व उपचार करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंशावरील प्रतिविष औषधांसह आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

याशिवाय सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृतीवर भर देण्यासोबतच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि एचपीव्ही लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button