वातावरण बदलाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी ३५ आदिवासी गावांचा निर्धार

वातावरण बदलाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी ३५ आदिवासी गावांचा निर्धार
पर्यावरण, शेती व उपजीविका संवर्धनासाठी जैन हिल्स येथे एकदिवसीय कार्यशाळा; गावपातळीवर वातावरणीय बदल संदर्भ केंद्र उभारण्याचा निर्णय
जळगाव : वातावरण बदलाच्या वाढत्या संकटाला सामोरे जाण्यासाठी पर्यावरण, शेती, जलसुरक्षा आणि उपजीविका संवर्धन व संरक्षणाचा निर्धार जळगाव जिल्ह्यातील ३५ आदिवासी गावांच्या प्रतिनिधींनी केला. लोक संघर्ष मोर्चा आणि असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्ट रोजी जैन हिल्स, जळगाव येथे वातावरण बदलाच्या संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
३५ गावांचे प्रतिनिधी सहभागी
महाराष्ट्रातील वातावरणीय बदलांच्या दृष्टीने संवेदनशील गावांमध्ये दुष्काळाची पूर्वतयारी, जलसुरक्षा, वन व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन तसेच वातावरण बदलाच्या संकटांचा सामना करण्याची क्षमता बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील ३५ गावांचे प्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्ते या कार्यशाळेत एकत्र आले. वातावरण बदलासंदर्भातील कृतींमध्ये ग्रामस्थांचे नेतृत्व, त्यांचे अनुभव आणि विचार केंद्रस्थानी ठेवून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रतिभाताई शिंदे, शेहजो सिंग तसेच असर संस्थेचे विश्वजीत पुजारी, प्रवीण मोते, अनिकेत नवलकर आणि सुहास जोशी यांनी मार्गदर्शन केले.
तापमानवाढ, दुष्काळ आणि अवकाळी पावसावर चर्चा
कार्यशाळेत वातावरण बदलाची सद्यस्थिती, त्यामागील वैज्ञानिक आधार, वाढते तापमान, दुष्काळ, बदलते ऋतुमान आणि अवकाळी पावसाच्या वाढत्या समस्यांमुळे होणाऱ्या परिणामांवर सहभागी ग्रामस्थांनी आपले अनुभव मांडले. वातावरण बदलाचा आदिवासी समुदायांवर थेट परिणाम वाढत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
पाण्यासाठी करावी लागणारी वाढती वणवण, वाढत्या तापमानामुळे घरकाम करताना निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच उष्णतेचा आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम यांसह विविध समस्यांकडे सहभागींचे लक्ष वेधण्यात आले.
गावपातळीवर कृती आराखडे तयार करण्यावर भर
वातावरण बदलाच्या आव्हानांवर उपाययोजना करताना असलेल्या त्रुटी आणि संभाव्य उपायांवरही व्यापक चर्चा करण्यात आली. वातावरण बदलाच्या संकटाचा एकत्रितपणे सामना करण्यासाठी गावपातळीवर कृती आराखडे कसे तयार करता येतील, याबाबत सहभागी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
दुष्काळ, वाढता कर्जबाजारीपणा, पाण्याची कमतरता, अवकाळी पाऊस आणि पूरपरिस्थिती यांचा विविध घटकांवर होणारा परिणामही ग्रामस्थांनी मांडला. गावपातळीवर वातावरण बदल आणि उपजीविका संरक्षणासाठी ‘वातावरणीय बदल संदर्भ केंद्र’ तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ
कार्यशाळेच्या शेवटी सर्व सहभागी प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी वातावरणीय बदलाचा सामना करण्यासोबतच पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याची सामूहिक शपथ घेतली.







