निजामपूर येथे अन्न व्यावसायिकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात

निजामपूर येथे अन्न व्यावसायिकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात
धुळे प्रतिनिधी : अन्न व औषध प्रशासन, धुळे यांच्या वतीने निजामपूर येथे अन्न व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आलेली एक दिवसीय कार्यशाळा आज वाणी समाज मंगल कार्यालय निजामपूर, तालुका – साक्री, जिल्हा – धुळे येथे उत्साहात संपन्न झाली. निजामपूर परिसरातील 350 विविध अन्न व्यवसायिकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक आयुक्त (अन्न), धुळे श्री. गोपाल माहोरे यांनी मार्गदर्शन करताना अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत आवश्यक बाबींचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सुरक्षित अन्न पुरवठा, ग्राहकांचा विश्वास आणि गुणवत्तापूर्ण व्यवसायासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
तसेच अन्न व्यावसायिकांनी घ्यावयाची काळजी, सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या भेसळीचे प्रकार, भेसळ ओळखण्यासाठी उपलब्ध शास्त्रीय चाचण्या, सोप्या प्राथमिक तपासणी पद्धती यांच्या प्रमाणावरून भेसळीची शक्यता कशी ओळखता येते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यांनी अन्न व्यवसायिकांसाठी अन्न सुरक्षा मानकांचे पालन, स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, सुरक्षित उत्पादन प्रक्रिया, नोंदींचे व्यवस्थापन आणि कायदेशीर अनुपालन यांचे महत्त्व स्पष्ट केले.
अन्न व औषध प्रशासनातर्फे श्री. गो. वि. माहोरे, श्री.आ. भा. पवार, शशिकांत राणे तसेच श्री. अरविंद राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच नितीन बंब, किशोर जैन यांनी व्यापारी असोसिएशन द्वारे मनोगत व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निजामपूर परिसरातील अन्न व्यावसायिक संघटनेचे श्री. विजय रेलन, श्री. प्रवीण शहा, श्री. दिलीप गोपाळ, श्री. संदीप चिंचोले यांनी केले यांनी उपस्थित मान्यवर, तज्ज्ञ मार्गदर्शक व सहभागी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
अन्न व औषध प्रशासन, धुळे यांनी भविष्यातही अशा जनजागृतीपर व तांत्रिक मार्गदर्शनाच्या कार्यशाळांद्वारे सुरक्षित अन्न, गुणवत्तापूर्ण अन्न आणि ग्राहक संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.







