पुण्यातील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्समध्ये ४.५८ कोटींच्या सोन्याची चोरी; कर्मचारी अटकेत

पुण्यातील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्समध्ये ४.५८ कोटींच्या सोन्याची चोरी; कर्मचारी अटकेत
पुणे (प्रतिनिधी) : शहरातील नामांकित नीलकंठ ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या एका विश्वासू कर्मचाऱ्याने तब्बल ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ रुपयांचे सोनं चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १ एप्रिल २०२५ ते २६ मे २०२५ या कालावधीत घडला असून, पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
आरोपी प्रतीक नगरकर (वय ३५, रा. सुतारदार, कोथरूड) याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलकंठ ज्वेलर्समध्ये अंगठी, कॉइन व वेढणी काउंटरच्या देखरेखीची जबाबदारी नगरकर याच्याकडे होती. या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने २,२६२ ग्रॅम वजनाच्या १८० वेढण्या आणि २,४२६ ग्रॅम वजनाची ९४ सुवर्ण नाणी असा एकूण ४.५८ कोटी रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात नीलकंठ ज्वेलर्सचे व्यवस्थापक नितीन इरप्पा डांगे (वय ३७, रा. सांगवी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी प्रतीक नगरकर याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दागिन्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.