OtherCrime

पाचोरा तालुक्यातील वृद्ध महिलेच्या खुनाचा ४८ तासांत उलगडा; तिघांना अटक

पाचोरा तालुक्यातील वृद्ध महिलेच्या खुनाचा ४८ तासांत उलगडा; तिघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगांव हरेश्वर पोलिसांची  कारवाई

जळगाव (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यातील शेवाळे गावात ५ जून २०२५ रोजी रात्री घडलेल्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या निर्घृण खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगांव हरेश्वर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,
गुरुवार, ५ जून २०२५ रोजी रात्री ९ ते ११ वाजेच्या सुमारास शेवाळे गावातील श्रीमती जनाबाई महारु पाटील (वय ८५) यांच्या घरात अज्ञात व्यक्तींनी मागच्या दरवाजातून प्रवेश केला. त्यांनी जनाबाई यांच्या डोक्यावर टणक हत्याराने वार करून त्यांचा खून केला आणि कानातील सोन्याचे दागिने लुटून पळ काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.मयत जनाबाई यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम १०३(१), ३११, ३३२अ अंतर्गत गुन्हा क्रमांक १५१/२०२५ दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगांव हरेश्वर पोलिसांना विशेष सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने शेवाळे गावात गोपनीय माहिती गोळा करून संशयितांवर लक्ष केंद्रित केले.तपासादरम्यान, साहिल मुकददर तडवी (वय २१), राकेश बळीराम हातागडे (वय २१) आणि राजेश अनिल हातागडे (वय १८), सर्व रा. शेवाळे, यांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी सांगितले की, ते जनाबाई यांच्या घरासमोर नियमित बसून टिंगल-टवाळी करत असत. जनाबाई यांनी त्यांना खडसावल्याने रागाच्या भरात त्यांनी खून आणि चोरीचा कट रचला.

आरोपींनी ५ जून रोजी रात्री मागच्या दरवाजातून जनाबाई यांच्या घरात प्रवेश केला. टणक हत्याराने त्यांच्यावर हल्ला करून खून केला आणि सोन्याचे दागिने लुटून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली. यात स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय संदिप पाटील, पिंपळगांव हरेश्वरचे एपीआय प्रकाश काळे, पीएसआय शेखर डोमाळे, शरद बागल, विठ्ठल पवार, प्रकाश पाटील, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, महेश सोमवंशी, नरेंद्र नरवाडे, अभिजित निकम, अमोल पाटील, इमरान पठाण, मुकेश लोकरे, नामदेव इंगळे, मुकेश तडवी आणि सागर पाटील यांचा सहभाग होता.पुढील तपास:
या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय प्रकाश काळे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button