
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत धडक कारवाई करत ट्रक चालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा होऊन आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २० जून रोजी रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास फिर्यादी मुकेश रामराव राठोड (वय ३०), व्यवसाय : चालक रा. गांधी चौक, हरिओम नगर, महानगरपालिका मागील जालना हे त्यांच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एमएच-२१-बीएच-३५३६ घेऊन पाळधीहून जळगावकडे येत होते. बायपास महामार्गावर पोहोचताच चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांचा ट्रक अडविला. मुख्य आरोपी साहिल शेख जब्बार शेख उर्फ काळ्या व त्याच्या साथीदारांनी ट्रकमध्ये घुसून फिर्यादी व क्लिनरला बेदम मारहाण केली. यावेळी एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हातावर चाकूने तीन वेळा वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडील ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम तसेच मोबाईल फोनद्वारे फोन-पे स्कॅनरवरून १८ हजार रुपये जबरदस्तीने ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले आणि घटनास्थळावरून फरार झाले. जखमी चालकावर सध्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
तालुका पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३२६(२), ३२६(४), ३५(२), ३५(३) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी डीबी पथकाला तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व स्थानिक माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी शोधमोहीम राबवून अवघ्या १२ तासांच्या आत आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले.
चौघांना घेतले ताब्यात
अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपींमध्ये साहिल शेख जब्बार शेख उर्फ काळ्या (वय २६, रा. पाळधी, भवानी मंदिरासमोर, ता. धरणगाव, जि. जळगाव), विशाल चुडामण पाटील (वय २८, रा. हॉटेल साई पॅलेस मागे, बिबा नगर, जळगाव) आणि मोहित हेमंत गुजर (वय १९, रा. प्लॉट नं. ४५, मयूर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) यांचा समावेश आहे. तसेच या गुन्ह्यातील चौथा संशयीत विधीसंघर्षित बालक असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोघांविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हे
तपासादरम्यान मुख्य आरोपी साहिल शेख जब्बार शेख उर्फ काळ्या हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी धरणगाव पोलीस स्टेशन येथे बस अडवून बस चालकास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम ३४१, १४३, १४७, १४९, ५०४ व ५०६ अन्वये कारवाई करण्यात आली होती. तसेच आरोपी विशाल चुडामण पाटील याच्याविरुद्धही रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पथकात यांचा होता समावेश
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस हवालदार प्रदीप राजपूत, योगेश पाटील, अविनाश देवरे, कैलास झांगे, पोलीस वाहन चालक पंकज देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, मिलिंद सपकाळे आणि गणेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.





