
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पत्रकारांबाबत करण्यात आल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात जळगावात निषेधाची लाट उमटली आहे. गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना, जळगाव जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करून संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच खासदारांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी आणि या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकारांबाबत करण्यात आलेल्या कथित अवमानकारक वक्तव्यामुळे पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाही व्यवस्थेत पत्रकारिता ही महत्त्वाची संस्था मानली जाते. समाजातील विविध प्रश्न, समस्या आणि जनतेच्या भावना शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करत असतात. त्यामुळे पत्रकारांबाबत अपमानास्पद भाषेचा वापर होणे हे निषेधार्ह असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना, जळगाव जिल्ह्याच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. संबंधित खासदारांवर कायदेशीर व योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात यावी अशी आग्रही मागणी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेकडून करण्यात आली.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक सचिव भगवान सोनार, संस्थापक खजिनदार ललित खरे, जळगाव जिल्हा अध्यक्ष चेतन वाणी, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जळगाव शहर अध्यक्ष जितेंद्र कोतवाल, पत्रकार मनिष जोग, नरेंद्र पाटील, किशोर पाटील, योगेश सुने,पवन खंबायत, योगेश चौधरी, धर्मेंद्र राजपूत, संदीप वानखेडे, निखिल वाणी, विकास पात्रे, नाजनिन शेख, कल्पेश हिरवळकर, जगमोहसिंग ठाकुर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.






