प्रकाशकांनी 30 जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे; न केल्यास 10 हजारांचा दंड

प्रकाशकांनी 30 जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे; न केल्यास 10 हजारांचा दंड
मुंबई : प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, 2023 अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष 2024-25 चे विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांना 30 जून 2026 पर्यंतची अंतिम संधी देण्यात आली असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे भारत सरकारच्या प्रेस रजिस्ट्रार जनरल, नवी दिल्ली यांनी सूचित केले आहे.
अधिनियमातील कलम 14(1)(ब) व 14(3) नुसार निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र न भरल्यास संबंधित प्रकाशकांवर दंड आकारण्याची तरतूद आहे. पहिल्या चुकीसाठी किमान 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतर प्रत्येक चुकांसाठी दंडाची रक्कम दुप्पट होणार असून, एकूण दंडाची कमाल मर्यादा 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या सर्व प्रकाशकांनी 30 जून 2026 पर्यंत ऑनलाइन दाखल करावे, अन्यथा कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही प्रेस रजिस्ट्रार जनरल, नवी दिल्ली यांनी स्पष्ट केले आहे.





