यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे आवाहन: अफवा पसरवू नका, कायदेशीर कारवाई होईल

यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे आवाहन: अफवा पसरवू नका, कायदेशीर कारवाई होईल
यवतमाळ – यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागपूर शहरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे किंवा दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश, प्रतिमा, व्हिडीओ अथवा माहितीची शहानिशा न करता व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर प्रसारित करू नयेत. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत.
पोलीस दलाची कठोर भूमिका:
अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ती, समाज, धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावल्यास आणि त्यामुळे समाजात तणाव निर्माण झाल्यास संबंधित इसमांस गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सतर्क पोलीस दल व सोशल मीडिया मॉनिटरिंग:
यवतमाळ जिल्ह्यात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण पोलीस दल सतर्क आहे. तसेच सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आले असून, व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.
संबंधित ग्रुप अॅडमिनसह दोषींवर कारवाई:
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, नागपूर शहरातील घटनेच्या संदर्भात खोटे संदेश व अफवा सोशल मीडियावर पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या तसेच संबंधित ग्रुप अॅडमिनसह दोषींवर महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत कारवाई करण्यात येईल.
नागरिकांना सहकार्याची विनंती:
सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन यांना सूचित करण्यात येते की, आपण सर्वांनी यवतमाळ जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे. कोणत्याही शंका असल्यास स्थानिक पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा.