भडगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; व्यापाऱ्यांत तीव्र नाराजी

भडगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; व्यापाऱ्यांत तीव्र नाराजी
भडगाव | प्रतिनिधी : “भडगाव नगरपरिषदेचा आरोग्य विभाग नेमकं करतं तरी काय?” असा सवाल सध्या शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या तोंडून सातत्याने ऐकू येत आहे. कारण ठरलं आहे – बसस्थानक ते भडगाव नगरपरिषदेपर्यंतच्या परिसरातील एकमेव सार्वजनिक स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था!
दत्ता आबा शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागील या स्वच्छतागृहाचा दररोज वापर करणाऱ्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना याठिकाणी अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपुऱ्या देखभालीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपरिषदेने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.
या परिसरात झाडाझुडपांचा सुकलेला जंगलासारखा विस्तार झाल्याने, नागरिकांना तेथे जाणे धोक्याचे ठरत आहे. सर्प आणि अन्य विषारी प्राणी शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या परिसरात दिसून येत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे “शहराच्या मध्यवर्ती भागातील आरोग्यसुविधा जर अशा असतील, तर मग नागरी आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल उपस्थित होत आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, स्वच्छतागृहाच्या देखभाल व्यवस्थेकडे नगरपरिषद गंभीरपणे दुर्लक्ष करत आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन गप्प का? असा रोष नागरिकांतून व्यक्त होत आहे.
शहराच्या आरोग्यविषयक व्यवस्थेकडे नगरपरिषदेने तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सध्या शहरभर होत आहे. अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही व्यापाऱ्यांनी दिला आहे.