
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा खून; दीराला जन्मठेप
जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल
जळगाव प्रतिनिधी : मालमत्तेच्या कागदपत्रांवरून झालेला वाद भावजयीच्या हत्येपर्यंत पोहोचलेल्या प्रकरणाचा तब्बल चार वर्षांनंतर निकाल लागला आहे. पिंप्राळा परिसरातील मधुर कॉलनी येथे 21 मे 2022 रोजी झालेल्या योगिता मुकेश सोनार यांच्या खूनप्रकरणी त्यांचे सख्खे दीर दिपक लोटन सोनार याला जळगाव जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
मालमत्तेच्या कागदपत्रांवरून वाद
न्यायालयीन कागदपत्रांनुसार, मालमत्तेच्या कागदपत्रांवरून दिपक सोनार आणि त्याची भावजय योगिता सोनार यांच्यात वाद सुरू होता. दि. 21 मे 2022 रोजी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. संतप्त झालेल्या दिपकने योगिता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गंभीर जखमी झालेल्या योगिता यांचा मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर आरोपीने कुऱ्हाड घटनास्थळी फेकून तेथून निघून गेल्याचेही तपासात समोर आले.
अल्पवयीन मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची
या खटल्यात मृत योगिता यांच्या अल्पवयीन मुलाची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाने एकूण १७ साक्षीदार तपासले. पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, शासकीय दस्तऐवज परीक्षक तसेच तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या साक्षी खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य
सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी न्यायालयासमोर साक्षी-पुरावे सादर करत प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश-२ ए. एस. खडसे यांच्या न्यायालयाने दिपक लोटन सोनार याला दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे चार वर्षांपासून सुरू असलेल्या या खूनखटल्याचा अखेर निकाल लागला आहे.







