Detection

Detection Story : तेलंगणात कामाला गेला, गुन्हेगारांसोबत खून केला, जळगावात एलसीबीने पकडून आणला

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील एक तरुण कामानिमित्त तेलंगणा राज्यात गेला होता. त्याठिकाणी दोन महिने राहिल्यानंतर त्याची ओळख त्याठिकाणी असलेल्या काही हिस्ट्रीशिटर तरुणांशी झाली. मार्च महिन्यात ओळखीतून त्या तरुणांच्या माध्यमातून पाच जणांनी शेजारी राहणाऱ्या एकाचा खून केला. खुनानंतर जळगावातील तरुणाने पळ काढला. शहरात निवांत असताना तेलंगणा पोलीस पोहचले. पोलीस अधिक्षकांची भेट घेतली असता त्यांनी हे प्रकरण एलसीबीकडे वर्ग केले. एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.

जादूटोण्याच्या संशयातून केला खून
सायबराबाद (तेलंगणा) येथील चंदनगरमधील पापीरेड्डी कॉलनीतील रहिवासी मोहम्मद नसीर (४१) हा मुख्य संशयित चंदनगरमधील नेहरूनगर येथील रहिवासी फकरुद्दीनचा मित्र होता. फकरुद्दीनच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसेच, फकरुद्दीनला आरोग्याच्या समस्या होत्या आणि त्या व्यक्तीला शंका येऊ लागली की नसीर त्यांच्या कुटुंबावर जादूटोणा करत आहे. फकरुद्दीनने वाद मिटवण्यासाठी एका गुंड बुरहानला मदत केली. २१ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांनी नसीरला चर्चा करण्यासाठी बोलावले आणि गोपीनगर चेरुवू येथील एका निर्जन ठिकाणी नेले जिथे पाचही संशयितांनी त्याच्यावर काठ्यांनी हल्ला केला ज्यामुळे नसीरचा मृत्यू झाला.

तिघांना अटक, दोघे होते फरार
हत्येप्रकरणी चंदनगर पोलिसांनी मोहम्मद फकरुद्दीन (२८), मोहम्मद बुरहान (४४) आणि मोहम्मद कलीम (३८) यांना अटक केली होती तर अजहर आणि मोहम्मद अली हे दोघे फरार होते. अझहर निजाम खाटीक याने पळ काढून जळगाव गाठले होते. जळगावात आल्यानंतर तो काहीही झाले नसल्याचे बिनधास्तपणे फिरत होता. मित्राच्या नावाने सिमकार्ड घेत ते तो वापरत होता.

जळगाव एलसीबीने केली अटक
गेल्या आठवड्यात अझहर निजाम खाटीक याची माहिती काढून त्याला अटक करण्यासाठी चंदनगर पोलीस स्टेशनचे एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक कर्मचारी जळगावात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची भेट घेत त्यांनी सर्व माहिती दिली. पोलीस अधिक्षकांनी याप्रकरणात लक्ष घालण्यासाठी एलसीबी निरीक्षक बबन आव्हाड यांना सूचना केल्या. एलसीबीचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील आणि हवालदार अक्रम शेख यांनी अझहरची माहिती घेऊन त्याच्या घराच्या परिसरात सापळा लावला. रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

सिगारेट पिण्यासाठी आला आणि फसला
पोलीस लक्ष ठेवून असताना त्यांना माहिती मिळाली कि, अझहर रात्री सिगारेट पिण्यासाठी बाहेर येतो. रविवार दि.१८ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता अझहर निजाम खाटीक घराबाहेर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चंदानगर पोलीस स्टेशन, सायबराबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button