अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल
अमळनेर: तालुक्यातील एकलहरे गावात एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी जमावाने एका तरुणाला पकडून बेदम चोप दिल्याची घटना घडली. हा प्रकार १ जून रोजी दुपारी सुमारे १:३० वाजता घडला असून, आरोपीवर पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर अक्रम अली खान (वय २२, रा. अमळनेर) असे आरोपीचे नाव असून, तो एकलहरे गावात बांधकामस्थळी मिस्तरी म्हणून काम करत होता. कामादरम्यान त्याने गल्लीतील एका अल्पवयीन मुलीकडून पाणी मागण्याच्या बहाण्याने तिच्या घरी प्रवेश केला. त्यानंतर मुलीचा हात पकडून तिला ‘उद्या आपण पळून जाऊया’ अशी अवाच्य भाषा करत त्याचा मोबाईल नंबर दिला, अशी फिर्यादीत नोंद आहे.
त्यानंतर आरोपीने हे प्रकरण कोणालाही सांगितल्यास तिला व तिच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने घडलेली घटना तिच्या पालकांना सांगितल्यावर ग्रामस्थांनी त्वरित कारवाई करत आरोपीला पकडून चोप दिला.. मारहाणीनंतर आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात आरोपी समीर अक्रम अली खान याच्याविरोधात पोस्को कायदा कलम १२ तसेच भारतीय दंड संहिता कलम 354 (अ), 506, 448 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.