‘दम मारो दम’ : जळगाव शहरात आठ जण गांजा ओढताना आढळले !

‘दम मारो दम’ : जळगाव शहरात आठ जण गांजा ओढताना आढळले !
पोलिसांची अमली पदार्थ विरोधी कारवाई
प्रतिनिधी | जळगाव
जळगाव जिल्हा पोलिस दलामार्फत सुरू असलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेत शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी कारवाई करत चिलीमने गांजा सेवन करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई शहर, एमआयडीसी, रामानंदनगर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
यामध्ये पिंप्राळा हुडको परिसरात जुबेर उस्मानखान पठाण (वय ३०) हा चिलीमने गांजा पिताना आढळून आला. तर निमखेडी शिवारात गिरणा नदीपात्राजवळ दीपक श्रावण गायकवाड (वय ३८, रा. सत्यम पार्क) आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे खुलेआम गांजा सेवन करत होते.
तसेच मेहरूण गार्डन परिसरात, गणेश गुलाबचंद कस्तुरे (वय २३, रा. कुसुंबा) आणि दीपक प्यारेलाल चव्हाण (वय २९, रा. सुप्रीम कॉलनी) हे महाव मंदिरासमोरील मोकळ्या जागेत चिलीमने गांजा पिताना सापडले.
शिवाजीनगर उड्डाण पुलाखाली, जिल्हा परिषद कार्यालयाच्या मागे मो. साजिद अब्दुल गनी शेख (वय ४३, रा. उमर कॉलनी) आणि विजय भगवान लोहार (वय ३७, रा. शिवाजीनगर हुडको) हेही गांजा पिताना आढळले.
केळकर मार्केटमागे, खान्देश मिल कामगार भवनाच्या बंद इमारतीत बाळू पीतांबर सपकाळे (वय ३२, रा. कांचननगर) हा गांजा सेवन करताना अटक करण्यात आली.
एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई
सर्व आठही जणांविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलिस ठाण्यांकडून सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही मोहीम अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.