पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्या पती वाहनासह जेरबंद

पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्या पती वाहनासह जेरबंद
शिरवळ पोलिसांची कामगिरी
सातारा, ; _ शिरवळ पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे एका गंभीर खुनाच्या प्रकरणातील आरोपीला त्याच्या वाहनासह जेरबंद करण्यात यश आले आहे. आरोपीने आपल्या पत्नीचा खून करून तिचे शव बॅगेत भरून बेंगलोरहून मुंबईच्या दिशेने पळ काढला होता. मात्र, शिरवळ पोलीस स्टेशनच्या तत्परतेमुळे त्याला अटक करण्यात आली.
प्रकरणाची पार्श्वभूमी
आरोपी राकेश राजेंद्र खेडेकर (वय ३५, धंदा: नोकरी, रा. जोगेश्वरी, मुंबई) हा मूळचा मुंबईचा रहिवासी असून, फेब्रुवारी २०२५ मध्ये आपली पत्नी सौ. गौरी (वय ३२) हिच्यासह बेंगलोर येथील बनारगट्टा, तेजस्विनी नगर येथे राहण्यास गेला होता. राकेश वर्क फ्रॉम होम करत होता, तर गौरी नोकरीच्या शोधात होती. दिनांक २६ मार्च २०२५ रोजी रात्री गौरीने पुन्हा मुंबईला परत जाण्याचा आग्रह धरला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. गौरीने घरातील भांडी फोडण्यास सुरुवात केली, तर राकेशने तिला समजावण्याचा प्रयत्न केला की, त्यांनी राहत्या रूमसाठी डिपॉझिट भरले आहे आणि आता रूम सोडल्यास पैसे परत मिळणार नाहीत. तसेच, बेंगलोरला येण्यासाठी खूप खर्च झाला आहे.
मात्र, गौरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. वाद वाढत गेला आणि गौरीने चाकू घेऊन राकेशला मारण्याची धमकी दिली. याचा राग राकेशला आला आणि त्याने गौरीच्या हातातील चाकू हिसकावून तिच्या मानेवर, गळ्यावर आणि पाठीवर वार केले. गंभीर जखमी झालेली गौरी घराच्या लॉबीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.
खुनानंतर पलायनाचा प्रयत्न
पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर राकेशने घरातील एक मोठी बॅग रिकामी करून गौरीचे शव त्यात ठेवले आणि बॅगेची चेन लावली. ही बॅग त्याने बाथरूमच्या बाहेर ठेवली. त्यानंतर, दिनांक २७ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास राकेशने आपले साहित्य आणि मालकीची होंडा सिटी कार घेऊन जोगेश्वरी, मुंबईच्या दिशेने बेंगलोरहून पलायन केले.
प्रवासादरम्यान, खुनाचे टेन्शन आल्याने राकेशने महाराष्ट्रातील कागल गावात एका मेडिकल स्टोअरमधून हार्पिक, सॅनिटायझर आणि झुरळ मारण्याचे औषध खरेदी केले. कोल्हापूर-कराड मार्गे प्रवास करताना त्याने बेंगलोरमधील त्याच इमारतीत खालच्या मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीला फोन करून पत्नीच्या खुनाची आणि शव बॅगेत ठेवल्याची माहिती दिली.
शिरवळ येथे आरोपी जेरबंद
खंडाळा घाट उतरल्यानंतर शिरवळ येथील निप्रो कंपनीजवळील हायवेवर राकेश कार घेऊन पोहोचला. खुनाच्या टेन्शनमुळे त्याने खरेदी केलेले सर्व कीटकनाशक आणि औषधे एकत्र करून प्यायली. त्यामुळे त्याला त्रास होऊ लागला आणि तो कारमधून खाली उतरून रस्त्यावर बसला.
याचवेळी, एका मोटरसायकलस्वाराने राकेशला पाहिले आणि त्याची विचारपूस केली. राकेशने फिनायल प्यायल्याचे सांगितल्यावर त्या दुचाकीस्वाराने त्याला तात्काळ शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे उपस्थित असलेले शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कुंभार यांनी राकेशकडे चौकशी केली असता, त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.
शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी तात्काळ जोगळेकर हॉस्पिटलमधून माहिती घेऊन सातारा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस अधीक्षकांनी बेंगलोर पोलीसांशी संपर्क साधून गौरीच्या खुनाची खात्री केली आणि शिरवळ पोलीसांना पुढील तपासाच्या सूचना दिल्या. तसेच, बेंगलोरमधील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पोलीस निरीक्षक नलावडे यांना पुरवले.
या प्रकरणाची माहिती अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर आणि पोलीस उपविभागीय अधिकारी (फलटण विभाग) श्री. राहुल धस यांनाही देण्यात आली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार, राकेशच्या नातेवाइकांशी आणि बेंगलोर पोलीसांशी संपर्क साधून त्यांना आरोपी आणि त्याच्या उपचाराबाबत माहिती देण्यात आली.राकेशला अधिक उपचारांची गरज असल्याने त्याला प्रथम भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल आणि नंतर ससून हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले. आज पहाटे बेंगलोर पोलीस ससून हॉस्पिटलमध्ये पोहोचले असून, त्यांनी आरोपीकडे चौकशी सुरू केली आहे.
राकेश हा पळून जाण्याच्या आणि कीटकनाशक पिऊन आत्महत्येच्या प्रयत्नात होता. मात्र, नागरिक आणि शिरवळ पोलीसांच्या तत्परतेमुळे त्याला वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आले.
पोलीस पथकाचे कौतुक
ही कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलीस हवालदार कुंभार, नलावडे, धुमाळ, मोहरे, पोलीस शिपाई दीपक पाले, पवार आणि होमगार्ड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. शिरवळ पोलीस स्टेशनच्या या सतर्कतेमुळे एका गंभीर गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.