
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातून सकाळच्या सुमारास धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्येष्ठ मंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्यदूत आणि आमदार अमोल जावळे यांचे निकटवर्तीय पेहलवान शिवाजी पाटील (शिवा) यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ७ वाजता शिवाजी पाटील हे आपल्या राहत्या घरून दुचाकीने व्यायामशाळेकडे जात होते. याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच.१९.एएन.३१४३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, शिवाजी पाटील यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रॅक्टर जळगाव महानगरपालिकेचा असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या ट्रॅक्टरवरील चालक अल्पवयीन असल्याचे समजते. त्यामुळे महानगरपालिकेच्या वाहनावर अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवत असल्यास ही बाब गंभीर ठरण्याची शक्यता आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताची माहिती घेतली आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार अद्याप या प्रकरणी पोलिसात कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही. दरम्यान, जखमी शिवाजी पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.






