Crime

ईद, दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची विशेष वाहतूक मोहीम

साडेसात हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई; ५२ लाख ४५ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल

ईद, दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची विशेष वाहतूक मोहीम

साडेसात हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई; ५२ लाख ४५ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल

जळगाव | प्रतिनिधी ईद, दहीहंडी आणि गणेशोत्सव हे सण उत्साहात व शांततेत साजरे होत असताना शहरासह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत शिस्त निर्माण व्हावी आणि बेशिस्त व धोकादायक वाहनचालकांना आळा बसावा, यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांकडून विशेष वाहतूक कारवाई मोहीम राबविण्यात आली.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. सकाळी, सायंकाळी तसेच रात्री ११ वाजेपर्यंत विशेष तपासणीवर भर देण्यात आला.

नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

मोहिमेदरम्यान विना हेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट, अतिवेगाने वाहन चालविणे, बेकायदेशीर पार्किंग, मद्यपान करून वाहन चालविणे, अल्पवयीनांकडून वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, राँग साईड वाहन चालविणे यासह विविध वाहतूक नियमभंगांवर कारवाई करण्यात आली.तसेच मॉडिफाइड सायलेन्सर, ट्रकला लाईट किंवा रिफ्लेक्टर नसणे, विनापरवाना शालेय वाहतूक, शाळा-महाविद्यालय परिसर आणि एमआयडीसी परिसरातील वाहतूक नियमभंगांवरही पोलिसांनी कारवाई केली.

जिल्ह्यात ५६७० प्रकरणे; महामार्ग सुरक्षा पथकाचीही कारवाई

जिल्हा पोलिस दलाकडून विविध वाहतूक नियमभंगांप्रकरणी ५६७० केसेस दाखल करण्यात आल्या असून, त्यातून ३९ लाख ७० हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.याशिवाय महामार्ग सुरक्षा पथकाकडून १४३५ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, १२ लाख ७५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.अशाप्रकारे जिल्हा पोलिस दल आणि महामार्ग सुरक्षा पथकाची मिळून एकूण ७१०५ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, एकूण ५२ लाख ४५ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सर्वाधिक कारवाई विना हेल्मेट व इतर नियमभंगांवर

विशेष मोहिमेत विना हेल्मेट वाहनचालकांविरोधात ८५३, ट्रिपल सीटसाठी ५५९, बेकायदेशीर पार्किंगसाठी ५४१, वाहन चालविताना मोबाईल वापरल्याप्रकरणी १२०, विनापरवाना शालेय वाहतुकीप्रकरणी ११२, शाळा-महाविद्यालय परिसरात १९७ तर इतर मोटार वाहन कायद्यांतर्गत २८५४ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.

याशिवाय अतिवेगाने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे, अल्पवयीन चालक, सिग्नल उल्लंघन, मॉडिफाइड सायलेन्सर, राँग साईड ड्रायव्हिंग आदी प्रकरणांमध्येही कारवाई करण्यात आली.

सणांचा आनंद घेताना नियम पाळण्याचे आवाहन

“सणांचा आनंद घेताना नागरिकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. तसेच रस्त्यावर इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये,” असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

या विशेष मोहिमेचे निरीक्षण सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात स्वतः केले. अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा आणि महामार्ग सुरक्षा पथकातील अधिकारी व अंमलदारांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button