यावलमधील पाणीटंचाईवर उपाययोजनांची मागणी

यावलमधील पाणीटंचाईवर उपाययोजनांची मागणी
जुन्या विहिरी तात्काळ सुरू करण्यासाठी नगर परिषदेला निवेदन
यावल | प्रतिनिधी
यावल शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या विहिरी तात्काळ कार्यान्वित करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक गटनेते सागर चौधरी आणि नगरसेविका वैशाली निलेश बारी यांनी यावल नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यावल शहराला दरवर्षी हातनूर धरणाच्या आवर्तनातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र यावर्षी निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईमुळे धरणातून आवर्तन सोडण्यात आलेले नसल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
शहरात पूर्वी वापरात असलेल्या अनेक जुन्या विहिरी आजही अस्तित्वात असून त्यांची साफसफाई, दुरुस्ती व आवश्यक यंत्रणा बसवून त्या पुन्हा सुरू केल्यास पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे. या माध्यमातून नागरिकांना नियमित व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नगर परिषदेने शहरातील सर्व जुन्या विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांची स्वच्छता, दुरुस्ती तसेच पाणी उपसा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने या जनहिताच्या मागणीची तात्काळ दखल घ्यावी व योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सागर चौधरी आणि वैशाली बारी यांनी व्यक्त केली आहे.
यावलमध्ये दिवसेंदिवस तीव्र होत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या मागणीला नागरिकांकडूनही पाठिंबा मिळत असून नगर परिषद प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.






