Other

करिश्मा नायर यांची रावेर तालुक्यातील विविध कामांना भेट,रात्रीच्या वेळी साधला नागरिकांशी संवाद

करिश्मा नायर यांची रावेर तालुक्यातील विविध कामांना भेट,रात्रीच्या वेळी साधला नागरिकांशी संवाद

घरकुल, आरोग्य, पाणीपुरवठा व शाळा व्यवस्थापनाबाबत दिल्या सूचना

जळगाव/प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवार दि.१९ जून रोजी रावेर तालुक्यातील पेसा क्षेत्रात येणाऱ्या विविध विकासकामांना भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर्जेदार कामाबाबत व आदिवासी पेसा क्षेत्रातील नागरिका सुविधांपासून वंचित राहू नयेत या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या.त्या सोबतच रात्रीच्या वेळी चावडी बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत चावडी बैठकीत उपस्थित झालेल्या समस्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या.

या दौऱ्यादरम्यान करिश्मा नायर यांनी रावेर पंचायत समिती आवारातील मेस, लेडीज व जेन्ट्स टॉयलेट आदी सुविधांची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी आवश्यक दुरुस्ती व स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. रावेर आवारातील सुरू असलेल्या सभागृह व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामांचीही पाहणी करून कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना करण्यात आल्या
भेटीदरम्यान त्यांनी रावेर तालुक्यातील कुसुंबे खु, पाल ,सहस्त्रलिंग व खिरोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन व्ही.बी.रामजी ६ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे व नोंदी पूर्ण करून कामकाज अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी रावेर येथील काही घरकुल लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची पाहणी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधून बांधकामातील अडचणी जाणून घेतल्या. अपूर्ण घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आवश्यक त्या बाबींसाठी संबंधित यंत्रणांनी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर त्यांनी ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या शाळा खोली बांधकाम व भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्राच्या कामांची पाहणी केली. कामांचा दर्जा, प्रगती व नियोजन याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विविध समस्या जाणून घेतल्या. नागरिकांना वेळेत व दर्जेदार सेवा देण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
भेटीदरम्यान रात्र होऊन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी खिरोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट देऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.आरोग्य केंद्रांतर्गत येणारी गावे व तेथील आरोग्य सुविधांची माहिती घेऊन कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
आदिवासी दुर्गम भागात रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला यामुळे नागिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी त्यांच्यासोबत पहाणी दौऱ्यामध्ये रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद मेढे ,सहाय्यक गटविकास अधिकारी वानखेडे ,जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उप अभियंता योगेश इंगळे ,सहायक अभियंता कोमल सिंग राजपूत , तालुका पेसा व्यवस्थापक युनुस तडवी, घरकुल विभागाचे आरएचइ धीरज धनगर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी रूबीयाना कुसुंबे खु. राजेंद्र तडवी सहस्त्रलिंग, सुनील सवर्णे पाल तसेच सरपंच मुबारक तडवी कुसुंबे खु., सौ.अकिला युनुस तडवी सहस्त्रलिंग, सौ.हाजरा कामील तडवी पाल तसेच तीनही गावांचे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button