अपूर्ण घरकुलांसाठी कृती आराखडा तयार करा; कामांना गती देण्याचे सीईओ करिश्मा नायर यांचे निर्देश

अपूर्ण घरकुलांसाठी कृती आराखडा तयार करा; कामांना गती देण्याचे सीईओ करिश्मा नायर यांचे निर्देश
भुसावळ तालुक्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आढावा बैठक; लाभार्थ्यांशी संवाद साधून अडचणी तातडीने सोडविण्याचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी
पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) टप्पा १ व २ अंतर्गत मंजूर होऊनही अपूर्ण राहिलेली घरकुले तातडीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील अपूर्ण घरकुलांचा कृती आराखडा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
सोमवारी (दि. ६ जुलै) भुसावळ पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित ग्रामपंचायत अधिकारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, गटविकास अधिकारी कुलदीप ठाकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी. एस. जाधव, विस्तार अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
अडचणी दूर करून बांधकामांना गती
जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. घरकुलासाठी मंजूर जागांवरील अतिक्रमणे हटविणे, प्रलंबित अडचणींचे निराकरण करणे तसेच लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
नियमित क्षेत्रभेटींचे निर्देश
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी अधिकाऱ्यांना नियमित क्षेत्रभेटी देऊन लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे निर्देश दिले. अपूर्ण घरकुलांच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवून बांधकामांना गती देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक तालुक्यात होणार आढावा
घरकुलांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः प्रत्येक तालुक्यात जाऊन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये अशा बैठका पार पडल्या असून उर्वरित तालुक्यांमध्येही लवकरच बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
‘एकही पात्र कुटुंब घराविना राहू नये’
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोणतेही पात्र कुटुंब घराविना राहू नये आणि मंजूर झालेली प्रत्येक घरकुलाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले.





