OtherPoliticsSocial

‘असावा एखादा छंद’ची खान्देशभर चर्चा; ‘खान्देशचा सरपंच’च्या पोस्टनी वाढवली धाकधूक!

व्यंग, टोमणे आणि सध्याच्या राजकारणावर थेट भाष्य : प्रत्येक पोस्टनंतर कमेंट सेक्शन बनतोय ‘जनतेचा दरबार’

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यांमध्ये सध्या एका इन्स्टाग्राम अकाउंटची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘खान्देशचा सरपंच’ या नावाने सुरू असलेल्या सोशल मीडिया अकाउंटने आपल्या वेगळ्या शैलीमुळे अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे, या अकाउंटवर सुरू करण्यात आलेली ‘असावा एखादा छंद’ ही मालिका सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंड होत असून, खान्देशातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तिची जोरदार चर्चा रंगली आहे.

या मालिकेत खान्देशातील विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय घडामोडींवर उपरोधिक पोस्टर आणि मिश्किल भाषेत भाष्य केले जाते. थेट कोणावरही आरोप न करता, सध्याच्या परिस्थितीवर मार्मिक टोले लगावणारी शैली हे या मालिकेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती हजारो लोकांपर्यंत पोहोचत आहे.

कमेंट सेक्शनमध्ये शेकडो प्रतिक्रिया
विशेष म्हणजे, या पोस्टवर होणाऱ्या प्रतिक्रिया देखील तितक्याच चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक समर्थक संबंधित व्यक्तींच्या बाजूने सकारात्मक भूमिका मांडताना दिसतात, तर विरोधक आणि सामान्य नागरिक पोस्टमधील व्यंगाचे कौतुक करताना दिसतात. अनेक पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये शेकडो प्रतिक्रिया उमटत असून, त्या पाहिल्यानंतर हे अकाउंट खान्देशातील सोशल मीडिया चर्चेचे प्रभावी व्यासपीठ बनल्याचे चित्र दिसून येत आहे.

समर्थक-विरोधकांचे विभिन्न मतप्रवाह
काही नेटकऱ्यांनी या पोस्ट विशिष्ट लोकप्रतिनिधींच्या समर्थनार्थ असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काहींच्या मते, काही पोस्ट मुद्दाम एखाद्या राजकीय नेत्याला लक्ष्य करून तयार केल्या जात आहेत. त्यामुळे या अकाउंटची निष्पक्षता, शब्दांची मर्यादा आणि राजकीय भूमिका यावरही सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

सोशल मिडिया प्रभावी माध्यम
राजकीय विश्लेषकांच्या मते, सोशल मीडियावरील व्यंगात्मक कंटेंटचा प्रभाव आता वाढत असून पारंपरिक राजकीय टीकेपेक्षा अशा पोस्ट सामान्य नागरिकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचतात. कमी शब्दांत आणि प्रभावी दृश्य माध्यमातून मांडलेले संदेश लोकांना सहज समजतात आणि त्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटतात.

पुढचा व्यंगात्मक टोला कोणावर?
सध्या ‘खान्देशचा सरपंच’ या अकाउंटवरील प्रत्येक पोस्टची उत्सुकता वाढली असून, पुढचा व्यंगात्मक टोला कोणावर असणार याकडे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष लागले आहे. राजकीय नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक अशा सर्व स्तरांवर या मालिकेची चर्चा सुरू असून, ‘असावा एखादा छंद’ ही मालिका खान्देशातील सोशल मीडिया विश्वातील एक वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे चित्र आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button